सियाचेनमध्ये हणमंतप्पांना तारण्याचा चमत्कार घडला योगाच्या सरावानं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2016 01:06 PM2016-02-10T13:06:07+5:302016-02-10T13:06:07+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा, जिद्द या गोष्टींबरोबरच योगाचा फायदा हणमंतप्पाना झाला असावा अशी एक शक्यता समोर आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - सियाचेनमध्ये बर्फाच्या ढिगा-याखाली पाच दिवस राहूनही जिवंत राहिलेले लान्स नाईक हणमंतप्पा हा एक चमत्कार मानण्यात येत आहे. हा चमत्कार घडण्यामागे प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा, जिद्द या गोष्टींबरोबरच योगाचा फायदा हणमंतप्पाना झाला असावा अशी एक शक्यता समोर आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार हणमंतप्पा हे अत्यंत धार्मिक गृहस्थ असून योगाचे अभ्यासक आहेत. गेली १३ वर्ष सैन्यात असलेले हणमंतप्पा योगामधले श्वसनाचे व्यायाम नित्यनेमाने करत, एवढेच नाही तर बरोबरच्या सैनिकांनाही त्यांनी योगा व विशेषत: श्वसनाचे व्यायाम शिकण्यासाठी सहाय्या केलं होतं.
सियाचेनमध्ये २०,५०० फूट उंचीवर ३५ फूट बर्फाच्या ढिगा-याखाली पाच दिवस जिवंत राहणं कसं शक्य असा प्रश्न या ठिकाणी काम केलेल्या अनेक सैनिकांनीच उपस्थित केला आणि हा चमत्कार असल्याचं म्हटलं आहे.
जवळपास २०० जणांच्या सैन्याच्या टीमने हिमवादळानं १९ मद्रास पोस्टची वाताहत केल्यावर बचावाचे कार्य सुरू केले. हणमंतप्पांना जिवंत बघितल्यावर त्यांचा आधी विश्वासच बसला नाही. त्या वातावरणात योग्य ती काळजी घेतली नाही तर चार तास देखील जिवंत राहणं शक्य नसताना या सैनिकांनी हा चमत्कार अनुभवला. आत्ताही हणमंतप्पांची तब्येत नाजूक असून त्यांच्यावर दिल्लीमध्ये लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बर्फाच्या ढिगा-याखाली पाच दिवस अडकून जिवंत राहणं अशक्य असल्याचं मत या प्रांतात घालवलेल्या निवृत्त लेफ्टनंट जनरल अता हस्नैन यांनी व्यक्त केलं आहे. आता हा चमत्कार हणमंतप्पा करत असलेल्या योगाच्या सरावामुळे होता की अन्य काही कारणामुळे हे वैद्यक शास्त्रच सांगू शकेल. परंतु रामदेवबाबांच्या सांगण्यानुसार अतीउंचीवर ऑक्सिजन विरळ असतो, परंतु योगाच्या सरावामुळे फुप्फुसे अत्यंत कार्यक्षम होतात आणि अत्यंत कमी ऑक्सिजनमध्ये ती जास्त चांगलं काम करतात. त्यामुळे योगाचा सराव केला तर अत्यंत कमी ऑक्सिजनमध्येही तग धरता येऊ शकते असं रामदेवबाबांनी सांगितलं आहे.