"हिंदू देवतांचा अपमान करणार्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 06:15 PM2022-07-08T18:15:30+5:302022-07-08T18:16:55+5:30
Mirchi Baba : हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा धर्मगुरु मिर्ची बाबा यांनी केली आहे.
ग्रेटर नोएडा : हरिद्वारच्या श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी वैरागानंद गिरी महाराज (धर्मगुरु मिर्ची बाबा) यांनी ग्रेटर नोएडामध्ये वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा धर्मगुरु मिर्ची बाबा यांनी केली आहे. दरम्यान, धर्मगुरु मिर्ची बाबा हे नोएडा दौऱ्यावर आहेत.
महामंडलेश्वरचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये हे एका षडयंत्राखाली होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, शिरच्छेद केल्याशिवाय त्यांना विश्वास बसणार नाही, असे म्हटले आहे. काली माँ चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरवर धर्मगुरु मिर्ची बाबा म्हणाले की, "अशा कृत्यांमुळे हिंदू धर्माला बदनाम करण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. माँ कालीचा अपमान होत आहे. निरंजनी आखाड्याचा संत असल्याने मी जाहीर करतो की, असे चित्रपट बनवणाऱ्यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना मी 20 लाख रुपये देईन."
याचबरोबर, 'आश्रम' या वेब सीरिजचे निर्माते हिंदू धर्मावर आघात करत असल्याचे धर्मगुरु मिर्ची बाबा यांचे म्हणणे आहे. जो कोणी दिवसाढवळ्या अशा चित्रपटाच्या निर्मात्यांचा शिरच्छेद करील, त्यांना मी माझ्या आश्रमाच्यावतीने 20 लाख रुपयांचे बक्षीस देईन. आंतरराष्ट्रीय षडयंत्राखाली अशी कामे केली जातात. आता त्यांचा शिरच्छेद केल्याशिवाय विश्वास बसणार नाही. सर्वत्र कायदेशीर कारवाई केली जात आहे. ठिकठिकाणी अर्ज दिले जात आहेत, मात्र कायद्याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही. कायद्याने या लोकांना पकडून कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे, असेही धर्मगुरु मिर्ची बाबा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'काली' या डॉक्युमेंट्री फिल्मच्या पोस्टरवरून वाद सुरूच आहे. यामध्ये माँ काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. यासोबतच माँ कालीच्या एका हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वजही दिसत आहे. 'काली' ही डॉक्युमेंट्री फिल्म निर्मात्या लीना मनिमेकलाई यांची आहे.