खासदाराने निवडणुकीपूर्वी १५ कोटींच्या कामांना दिलेली मंजुरी पराभूत होताच घेतली मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:09 AM2019-06-14T11:09:38+5:302019-06-14T11:11:07+5:30
संबंधीत योजना विभागातील अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल सहा कोटींच्या विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली होती. आता अचानक मंजुरी रद्द केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
पटना - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दल पक्षातील उलथापालथ अद्याप सुरूच आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि राज्यसभा सदस्य मीसा भारती यांनी लोकसभा निवडणुकीत पाटलीपुत्र मतदार संघातून झालेल्या पराभवानंतर आपल्या खासदार निधीतून करण्यात येत असलेल्या १५ कोटींच्या कामांची मंजुरी मागे घेतली आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार २०१६ मध्ये राज्यसभेत निवडून गेलेल्या मीसा भारती यांनी सुरुवातीच्या काळात खासदार निधी खर्च केला नव्हता. प्रत्येक खासदाराला आपल्या विभागात विकास कामांसाठी दरवर्षी प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी मीसा भारती यांनी आपल्या खासदार निधीतून ग्रामीण भागात विकास करण्यासाठी निधी दिला होता. आता हा निधी त्यांनी परत घेतला आहे. मिसा भारती यांना भाजपचे माजी केंद्रीय मंत्री राम कृपाल यादव यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत केले.
संबंधीत योजना विभागातील अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तब्बल सहा कोटींच्या विकास कामांसाठी मंजुरी देण्यात आली होती. आता अचानक मंजुरी रद्द केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदपत्र गोळा करावे लागणार असून त्यासाठी वेळ आणि उर्जा वाया घालवावी लागणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. तर या संदर्भात प्रतिक्रीया देण्यासाठी मीसा भारती उपलब्ध झाल्या नाहीत.
राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, या संदर्भात आपल्याला संपूर्ण माहिती मिळालेली नाही. त्यामुळे यावर आपण काहीही बोलू शकत नाही. तर भाजप प्रदेश प्रवक्ते संजय सिंह यांनी म्हटले की, यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात आहे.