२३० भारतीयांना न्यूझीलंडकडे नेणारी नौका समुद्रात बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:18 AM2019-01-23T04:18:32+5:302019-01-23T04:18:39+5:30
केरळच्या कोचीजवळील मुनाम्बम बंदरातून भारतीय स्थलांतरितांना १२ जानेवारी रोजी घेऊ न निघालेली देवमाता नावाची मासेमारी नौका बेपत्ता झाली आहे.
कोची : केरळच्या कोचीजवळील मुनाम्बम बंदरातून भारतीय स्थलांतरितांना १२ जानेवारी रोजी घेऊ न निघालेली देवमाता नावाची मासेमारी नौका बेपत्ता झाली आहे. या नौकेत २३० लोक असून, त्यात १०० हून अधिक महिला व काही लहान मुलेही आहेत. ही नौका न्यूझीलंडच्या दिशेने गेली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ते सर्व जण दिल्ली, तामिळनाडूमधील रहिवासी आहेत.
दिल्लीतील एका इसमाला अटक केल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे. हे सर्वजण आॅस्ट्रेलियाला जात असावेत, असा सुरुवातीचा अंदाज होता; पण ते न्यूझीलंडच्या दिशेला जात होते, असे नंतर सांगण्यात आले. न्यूझीलंडकडून या प्रकरणाची कोणतीही माहिती मिळालेली नाही; मात्र त्या देशात निर्वासितांना आश्रय दिला जात असल्याने ते तिथे रोजगारासाठी निघाले होते, असे समजते.
या स्थलांतरितांच्या ६० बॅगा व २० ओळखपत्रे पोलिसांना मुनाम्बमच्या टोल नाक्यापाशी सापडली. बॅगांमध्ये कपडे व वस्तू आहेत. सध्या ही नौका नेमकी कुठे आहे, याचा पत्ता लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी तटरक्षक दल व अन्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत. न्यूझीलंडपर्यंतचा प्रवास ९ हजार समुद्री मैलाचा आहे. या प्रवासात अनेकदा समुद्र खवळलेला असतो आणि मोठ्या वादळांचाही सामना करावा लागतो. (वृत्तसंस्था)
>कुटुंबियांचा
शोध सुरू
जे लोक नौकेतून गेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्या कुटुंबांतील काही लोक यापूर्वीही अशाच प्रकारे आॅस्ट्रेलियाला गेले होते. मात्र रोजगाराखेरीज परदेशात अवैध पद्धतीने जाण्याचे अन्य कारण दिसत नाही, असे पोलिसांनी सांगितले.
देवमाता या नौकेचा मालक बेपत्ता आहे. दिल्लीत पकडण्यात आलेल्या इसमाकडून आणखी माहिती मिळवली जात आहे.
मानवी तस्करीचा हा प्रकार असून, यापूर्वी किती लोकांना याप्रकारे नेले, याचाही तपास सुरू आहे.