बेपत्ता पोलीस उपअधीक्षक दोन वर्षांनी सापडले
By admin | Published: March 4, 2017 04:39 AM2017-03-04T04:39:38+5:302017-03-04T04:39:38+5:30
दोन वर्षांपूर्वी गूढरित्या बेपत्ता झालेले मध्यप्रदेशातील पोलीस उपाधीक्षक मानसिंह टेकाम हे बडवाह भागात एका लॉजवर सापडले.
खरगौन (मध्यप्रदेश) : दोन वर्षांपूर्वी गूढरित्या बेपत्ता झालेले मध्यप्रदेशातील पोलीस उपाधीक्षक मानसिंह टेकाम हे बडवाह भागात एका लॉजवर सापडले. बडवाहच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस उपाधीक्षक मानसिंह टेकाम बडवाह येथे असल्याची माहिती मिळाली होती. भोपाळ पोलिसांचे एक पथक या लॉजवर पोहचले आणि झडती घेतली असता एका खोलीत ते सापडले. या खोलीचा दरवाजा वाजवताच टेकाम यांनी दार उघडले आणि त्यांची ओळख पटविण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यांना घेऊन हे पथक भोपाळला रवाना झाले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी ते भोपाळ पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. त्याची तक्रार जहांगीराबाद पोलीस ठाण्यात दाखल होती.
ते का बेपत्ता होते याचे कारण समोर आलेले नाही. डीएसपी बेपत्ता झाल्याने त्यांचे कुटुंबीय आर्थिक अडचणीत होते. त्यांच्या
कुटुंबातील सदस्य अनुपपूर जिल्ह्यात चांदनिया गावात मजुरी करत होते. अशा आशयाच्या बातम्या स्थानिक मीडियातही आल्या होत्या. (वृत्तसंस्था)