बेपत्ता विमान समुद्रतळाशी?

By admin | Published: December 30, 2014 02:11 AM2014-12-30T02:11:50+5:302014-12-30T02:11:50+5:30

इंडोनेशियाहून १६२ लोकांसह उड्डाण घेतल्यानंतर बेपत्ता झालेले एअर आशियाचे विमान समुद्रतळाशी असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

Missing plane at sea? | बेपत्ता विमान समुद्रतळाशी?

बेपत्ता विमान समुद्रतळाशी?

Next

शोधमोहीम सुरूच : दुसऱ्या दिवशीही मागमूस नाही, चिंता वाढली
जकार्ता/सिंगापूर : इंडोनेशियाहून १६२ लोकांसह उड्डाण घेतल्यानंतर बेपत्ता झालेले एअर आशियाचे विमान समुद्रतळाशी असू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे अनेक देशांनी दुसऱ्या दिवशीही या विमानाचा शोध घेतला; मात्र त्याचा मागमूस लागू शकला नाही. जसजसा वेळ उलटतोय तसतशी प्रवासी बचावले असण्याची शक्यता धूसर होत चालली असून प्रवाशांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला आहे.
हे विमान समुद्राच्या तळाशी विसावले असेल, असे गृहितक असल्याचे इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध व बचाव संस्थेचे प्रमुख बाम्बंग सोइलीस्ययो यांनी सांगितले. विमानाचा संपर्क तुटला तेव्हाची स्थिती यावर हे गृहितक आधारलेले असल्याचे ते म्हणाले. ही प्रारंभिक भीती असून आमच्या शोधमोहिमेच्या निष्कर्षातून हे चित्र निर्माण होऊ शकते. जर विमान समुद्रतळाशी असेल तर त्याला वर आणणे खूपच आव्हानात्मक राहील. कारण, त्यासाठीची आवश्यक यंत्रणा इंडोनेशियाकडे नाही, असेही ते म्हणाले.
सिंगापूरला जाताना बेपत्ता झालेल्या क्यूझेड ८५०१ विमानाचा शोध घेत असलेल्या इंडोनेशियाच्या हेलिकॉप्टरला जावाजवळील समुद्रात दोन ठिकाणी तेलाचा तवंग दिसला, तर आॅस्ट्रेलियाच्या विमानाला नांग्का बेटाजवळ काही संशयास्पद वस्तू दिसल्या; मात्र इंडोनेशियाचे उपराष्ट्राध्यक्ष जुसूफ कल्ला यांनी तेलाचे हे तवंग बेपत्ता विमानाचे नसल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)



ते सुराबया विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. बेपत्ता झालेल्या विमानाने याच विमानतळावरून उड्डाण केले होते.
इंडोनेशिया एअर फोर्सचे प्रवक्ते रिअर मार्शल हादी ताहनंतो यांनी सांगितले की, जावानजीकच्या सागरी पाण्यात दोन ठिकाणी तेलाचे तवंग दिसले; मात्र या तवंगाचा विमानाशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.

शोध मोहिमेचे क्षेत्र वाढणार; भारत, चीनचा मदतीचा प्रस्ताव

इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध व बचाव संघटना शोध मोहिमेच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहे. शोधमोहीम इंडोनेशियाच्या बांग्का बेटाच्या किनाऱ्यापासून २७० सागरी मैल त्रिज्या एवढ्या भागावर केंद्रित असून तिची व्याप्ती आणखी वाढवली जाऊ शकते. विमानाचा संपर्क खंडित झाला तेव्हाच्या नोंदी व हवामानाच्या स्थितीवरून शोधमोहिमेचे क्षेत्र ठरविण्यात आले आहे.
विमानाच्या शोधमोहिमेत इंडोनेशियाची १२ जहाजे, १० नौका आणि दोन हेलिकॉप्टर सहभागी आहेत. याशिवाय मलेशिया व सिंगापूरची प्रत्येकी तीन जहाजे आणि एक विमानही शोध घेत आहे. याशिवाय आॅस्ट्रेलियाही शोध घेत असून भारत, चीनसह पाच देशांनी शोधमोहिमेसाठी मदतीची तयारी दर्शविली आहे.

विमान बदलल्यामुळे दहा जणांचे कुटुंब बचावले
जकार्ता : विमान बदलल्यामुळे दहा जणांचे इंडोनेशियन कुटुंब संकटातून बचावले. हे कुटुंब उड्डाणानंतर काही क्षणातच बेपत्ता झालेल्या एअर आशियाच्या फ्लाईट क्रमांक क्यूझेड ८५०१ या विमानातून प्रवास करणार होते. या सुदैवी कुटुंबाची सदस्य असलेल्या ख्रिस्तीनावाटी (३६) हिने सांगितले की, या दहा जणांमध्ये तिच्या कुटुंबासह तिची आई आणि तिच्या लहान भावाच्या कुटुंबाचा समावेश आहे.
नववर्ष साजरे करण्यासाठी आम्ही सिंगापूरला जात होतो. सहा प्रौढ व चार बालकांची सायंकाळी साडेसातच्या विमानाची (जे नंतर बेपत्ता झाले) तिकिटे काढण्यात आली होती; मात्र एअर आशियाने दोन तास आधीच्या विमानात (फ्लाईट क्रमांक क्यूझेड ८५०१) आमची व्यवस्था करून तसे एसएमएस, ई-मेल पाठविले. मात्र, आम्ही ते पाहिले नाही व ठरल्याप्रमाणे सायंकाळी साडेसातच्या विमानासाठी विमानतळावर आलो.
तेव्हा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आमचे विमान दोन तास आधीच सिंगापूरला रवाना झाल्याचे व पहाटे साडेपाच वाजताच्या दुसऱ्या विमानाने आम्हाला पाठविण्याची व्यवस्था केल्याचे सांगितले. साहजिकच आम्ही चिडलो होतो; मात्र पहाटेच्या विमानाने जाण्यास तयार झालो. नवी तिकिटे दिली जात असतानाच साडेसातचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे आम्हाला कळले. त्यामुळे आम्ही तिकिटे रद्द केली, असे त्या म्हणाल्या.





या दुर्घटनेची माहिती कळल्यानंतर मला रडे कोसळले. मी आणि माझे कुटुंबीय त्या विमानात नव्हतो ही सगळी देवाचीच करणी. ही ईश्वराचीच कृपा आहे. हे विमान लवकरात लवकर सापडावे व त्यातील प्रत्येक जण सुखरूप असावा, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते, असेही त्या म्हणाल्या.

 

Web Title: Missing plane at sea?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.