बेपत्ता पोलीस भोगतोय तिहारमध्ये जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:11 AM2019-05-09T05:11:26+5:302019-05-09T05:11:41+5:30
महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले.
मेरठ/बिजनोर - महिनाभराच्या रजेनंतरही कामावर रुजू न होऊन बेपत्ता असलेला पोलीस अधिकारी हा गाजलेल्या हत्याकांडातील दोषी असून, सध्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे हे समजायला पोलिसांनाच तब्बल पाच महिने लागले.
कंवरपाल सिंह (५५) असे त्याचे नाव आहे. त्याची शेवटची नियुक्ती ही बिजनोर बधापूर पोलीस ठाण्यात होती. १५ नोव्हेंबर रोजी सिंह महिनाभराच्या रजेवर गेला. तो उत्तर प्रदेश प्रॉव्हिन्शियल आर्मड् कॉन्स्टॅब्युलरचा (पीएसी) माजी कर्मचारी. २२ मे १९८७ रोजी मेरठच्या हाशीमपुरा भागात ४२ मुस्लिम पुरुषांच्या झालेल्या हत्याकांडात त्याच्यासह १५ जणांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. ४२ मुस्लिमांना गोळ्या घालून ठार मारून मेरठच्या कालव्यात फेकून देण्यात आले होते. १९ पीएसी जवानांना (त्यातील तिघांचा ३१ वर्षे चाललेल्या खटल्यात मृत्यू झाला) खालच्या न्यायालयाने निर्दोष ठरविले होते. हा निर्णय न्यायमूर्ती एस. मुरलीधर आणि विनोद गोयल यांनी फिरविला व ते ठरवून केले गेलेले मुस्लिमांचे हत्याकांड होते, असे म्हटले. (वृत्तसंस्था)
न्यायमूर्तींनी दोषी ठरलेल्यांच्या शिक्षेबद्दल करण्यात आलेल्या युक्तिवादाला प्रतिसाद न देता त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत तुरुंगात ठेवण्याची शिक्षा सुनावली.
३१ आॅक्टोबर, २०१८ रोजीच्या आपल्या निर्णयात उच्च न्यायालयाने दोषींना २२ नोव्हेंबरपर्यंत शरण येण्याचा आदेश दिला होता. ही मुदत कंवरपाल सिंह रजेवर जाण्याच्या नेमका एक आठवडा आधीची होती. साडेतीन महिन्यांनंतरही सिंह कामावर रुजू झाला नाही व सेवेचा भंग केला म्हणून बिजनोर पोलिसांनी त्याला १ एप्रिल, २०१९ रोजी निलंबित केले. तो हत्याकांडात दोषी ठरला आहे, याची बिजनोर पोलिसांना काही माहितीच नव्हती. त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला. त्या अहवालावरून बिजनोरच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला गेल्या आठवड्यात सेवेतून बडतर्फ केले.