'तो' अचानक गायब झाला, कुटुंबाने केले अंत्यसंस्कार; ४ वर्षांनी महाकुंभात घडला 'चमत्कार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:02 IST2025-02-22T14:02:23+5:302025-02-22T14:02:53+5:30
एक तरुण त्याच्या घरातून अचानक गायब झाला होता. कुटुंबाने खूप शोध घेतला पण कुठेही काहीही सापडला नाही.

'तो' अचानक गायब झाला, कुटुंबाने केले अंत्यसंस्कार; ४ वर्षांनी महाकुंभात घडला 'चमत्कार'
बिहारमधील सिवानच्या हुसेनगंज येथील एक तरुण त्याच्या घरातून अचानक गायब झाला होता. कुटुंबाने खूप शोध घेतला पण कुठेही काहीही सापडला नाही. थकलेल्या आणि निराश झालेल्या कुटुंबाने शेवटी त्याचे अंत्यसंस्कारही केले. पण आता ४ वर्षे ४ महिन्यांनंतर गावातून बेपत्ता झालेला हा तरुण प्रयागराजच्या महाकुंभमध्ये गर्दीत भीक मागताना दिसला. या बातमीने कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
हुसेनगंज मार्केटमधील चार ते पाच लोकांचा एक ग्रुप प्रयागराज महाकुंभात स्नान करण्यासाठी गेला होता. स्नान करून परत येत असताना, बेपत्ता तरुणाने त्याच्या गावातील लोकांना पाहिलं आणि ओळखलं. तो जवळ आला आणि त्याने या लोकांचे पाय धरले. जेव्हा लोकांनी काळजीपूर्वक पाहिलं तेव्हा या लोकांनीही त्याला ओळखले. तो दुसरा तिसरा कोणी नसून गावातील राम प्रवेश पंडित यांचा बेपत्ता मुलगा परमेश्वर पंडित होता. तो जन्मापासूनच मुका आणि अपंग होता. त्यामुळे त्याला चालता किंवा बोलता येत नव्हतं.
परमेश्वर गावातील लोकांना भेटल्याचं पाहून तिथे उपस्थित असलेल्या भिकारी गँगचा म्होरक्या तिथे आला. तो त्याला जबरदस्तीने सोबत घेऊन जाऊ लागला. परमेश्वर गावकऱ्यांचे पाय सोडायला तयार नव्हता. काही वेळातच तिथे लोकांची गर्दी जमली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. यानंतर सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.
प्रयागराज पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. कुटुंबाने त्याचं आधार कार्ड पाठवले. फोनवर सगळी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याला गावकऱ्यांसह घरी पाठवलं. भीक मागणाऱ्या गँगने त्याला किडनॅप केलं होतं. परमेश्वर प्रयागराजहून ट्रेनने त्याच्या गावी आला. जिथे त्याला त्याची आई रेखा देवी भेटली. आईने आपल्या मुलाला पाहताच त्याला मिठी मारली आणि भावनिक झाली.