MISSION 2019: आगामी लोकसभा निवडणुकीची धुरा मोदींच्याच हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 07:53 PM2018-07-09T19:53:57+5:302018-07-09T19:54:26+5:30
2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी दहा महिन्यांहून कमी वेळ राहिला आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी दहा महिन्यांहून कमी वेळ राहिला आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीही 2019मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी थेट जनतेशी स्वतः संवाद साधणार आहेत. येत्या काही महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वेळापत्रक फारच व्यस्त राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी देशभरात दौरे करणार असून, भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. आतापर्यंत मोदींनी राजस्थान आणि उत्तर प्रदेशचे दौरे करून तिथे प्रचारसभा घेतल्या आहेत. येत्या काही महिन्यात पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगालचेही ते दौरे करणार आहेत. येत्या ऑक्टोबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच राज्यांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दौ-यादरम्यान कोणत्या ना कोणत्या मोठ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाबरोबरच मोठी रॅलीही करण्याची शक्यता आहे. ज्यात ते स्वतःच्या कामाबद्दल माहिती देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभरातील दौ-यानंतर भाजपासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची आशा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये पल्लवित होणार आहे. भाजपानं राबवलेल्या कल्याणकारी योजनांचीही मोदी जनतेला माहिती देणार आहेत. तसेच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांच्या उभ्या राहत असलेल्या उंच प्रतिकृतीच्या अनावरणाची तारीखही निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबरला त्या प्रतिकृतीचं अनावरण करणार असल्याचीही चर्चा आहे.