मिशन 2024; NDA ने आखली रणनीती, खासदारांचे 10 गट पीएम मोदींसोबत बैठका घेणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 06:33 PM2023-07-20T18:33:01+5:302023-07-20T18:33:22+5:30
NDA Meeting: 18 जुलै रोजी राजधानी दिल्लीत भाजपच्या नेतृत्वातील NDA ची बैठक झाली.
NDA Meeting: राष्ट्रीय राजकारणासाठी 18 जुलै महत्वाचा दिवस होता. एकीकडे बंगळुरुमध्ये विरोधकांची, तर राजधानी दिल्लीत सत्ताधाऱ्यांची बैठक झाली. भाजपच्या नेतृत्वातील NDA च्या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. रिपोर्टनुसार, एनडीएतील खासदारांचे 10 वेगवेगळे गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गट पंतप्रधान मोदींसोबत बैठक घेणार आहे. यामध्ये सर्व खासदार आपल्या क्षेत्राची माहिती पीएम मोदींना देतील.
प्रादेशिक बैठक
25 जुलैपासून या बैठकांना सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये दररोज 2 वेगवेगळ्या प्रदेशांची बैठक होईल. पहिल्या दिवशी यूपी आणि ईशान्येची बैठक होणार आहे. ज्यामध्ये या दोन्ही प्रदेशातील खासदार उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक गटात 35 ते 40 खासदार असतील. दिल्लीत नुकत्याच झालेल्या बैठकीत एनडीएच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. 25 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान या बैठका होणार आहेत.
खासदारांचा अभिप्राय घेतला जाईल
समन्वयाची जबाबदारी केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या पहिल्या बैठकीत संजीव बल्यान आणि अजय भट्ट यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने सरचिटणीस तरुण चुग आणि सचिव ऋतुराज सिन्हा समन्वय करणार आहेत. खासदार त्यांच्या कामाचा अहवाल तयार करू शकतात.
एनडीए पक्षांनी निवेदन जारी केले
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) दिल्लीतील बैठकीनंतर एक निवेदन जारी केले की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुका लढवतील आणि 'प्रचंड बहुमताने' सलग तिसऱ्यांदा सत्तेवर परततील. एनडीएच्या मित्रपक्षांनी देशाच्या विकासाचे कौतुक करत मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा ठराव बैठकीत मंजूर केला आहे.