'मिशन 500'! 2030 पर्यंत मालामाल होणार भारत! मोदी-ट्रंप बैठकीनंतर करण्यात आली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 22:43 IST2025-02-14T22:42:37+5:302025-02-14T22:43:57+5:30
भारत आणि अमेरिकेने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी 'मिशन ५००' चीही घोषणा करण्यात आली आहे...

'मिशन 500'! 2030 पर्यंत मालामाल होणार भारत! मोदी-ट्रंप बैठकीनंतर करण्यात आली मोठी घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत, एफ-३५ लढाऊ विमानांच्या विक्रीसह पुढील १० वर्षांसाठी भारतासोबत संरक्षण भागीदारीवर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारण्यासंदर्भातही आश्वासन देण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या संयुक्त निवेदनादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "या वर्षापासून आम्ही भारतासोबतच्या लष्करी विक्रीत अब्जावधी डॉलर्सची वाढ करत आहोत. दरम्यान, भारत आणि अमेरिकेने दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी 'मिशन ५००' चीही घोषणा करण्यात आली आहे.
काय आहे भारत-अमेरिकेचे 'मिशन 500'?
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, मिशन ५०० अंतर्गत, २०३० पर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार दुपटीहूनही अधिक करत ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. निवेदनानुसार, दोन्ही नेत्यांनी आपल्या नागरिकांना अधिक समृद्ध, देशांना अधिक मजबूत, अर्थव्यवस्था अधिक नाविन्यपूर्ण आणि पुरवठा साखळी अधिक लवचिक बनवण्यासाठी व्यापार आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला आहे.
भारत कसा होईल मालामाल? -
भारत-अमेरिका मिशन ५०० चे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन, निष्पक्ष व्यापार अटींची आवश्यकता ओळखून, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २०२५ पर्यंत परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या (BTA) पहिल्या हप्त्यावर चर्चा करण्याच्या योजनेची घोषणा केली.
पीएम मोदीच्या या दौऱ्यादरम्यान कॉम्पॅक्टची घोषणाही करण्यात आली. कॉम्पॅक्ट (सैन्य भागीदारी, त्वरित वाणिज्य आणि तंत्रज्ञानासाठी उत्प्रेरक संधी) हा दोन्ही देशांदरम्या 'सहकार्याच्या प्रमुख स्तंभांमध्ये परिवर्तनीय बदल' आणण्यासाठी एक नवीन उपक्रम आहे.