Chandrayaan-3 : गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 12:25 PM2023-08-24T12:25:46+5:302023-08-24T12:39:12+5:30
Chandrayaan-3 : चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरून इतिहास रचला आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. या ऐतिहासिक यशाचे श्रेय झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील रहिवासी शास्त्रज्ञ सोहन यादव यांना जातं.
चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरून इतिहास रचला आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. या ऐतिहासिक यशाचे श्रेय झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील रहिवासी शास्त्रज्ञ सोहन यादव याला जातं. या संपूर्ण मिशनमध्ये सोहनचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. सोहनबद्दल जाणून घेऊया...
सोहनचे वडील ट्रक चालक आणि आई गृहिणी आहे. 4 भावंडांपैकी तिसरा असलेल्या सोहनचे बालपण खूप गरिबीत गेले, पण त्याच्या मनात जिद्द होती. वडिलांची मेहनत पाहून सोहनने पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातील सरस्वती शिशु विद्या मंदिरमध्ये घेतलं. त्यानंतर नवोदय विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला. त्यानंतर बरियातूच्या डीएव्हीमध्ये बारावी उत्तीर्ण झाला.
वयाच्या 21 व्या वर्षी इस्रोमध्ये मिळवलं स्थान
अभ्यासात टॉपर असलेल्या सोहनची स्वप्नं मोठी होती की ती प्रत्यक्षात आणण्याची जिद्द त्याच्यामध्ये होती. आयआयटी केल्यानंतर त्याला इस्रोमध्ये प्रवेश मिळाला. वयाच्या 21 व्या वर्षी इस्रोमध्ये रुजू झाल्यानंतर मेहनत आणि समर्पण पाहून सोहनने चंद्रयान-2 टीममध्ये आपले स्थान निर्माण केले. ही मोहीम अयशस्वी झाल्यानंतर त्याचा पुन्हा चंद्रयान-3 मध्ये समावेश करण्यात आला.
शास्त्रज्ञ सोहनची आई देवकी देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण केलं, पण आज तो यशस्वी झाला. जोपर्यंत चांद्रयान उतरत नाही, तोपर्यंत उपवास केला होता. याच्या लॉन्चिंगनंतर अनेक तीर्थक्षेत्री जाऊन ते यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे.
घरखर्च कमी करून मुलाला शिकवलं
सोहनचे वडील शिवशंकर हे ट्रकचालक आहेत. जेव्हा त्याची कमाई 3,000 रुपये होती, तेव्हा ते सोहनच्या शिक्षणावर 2,500 रुपये खर्च करत असे. मुलाचे समर्पण पाहून त्यांनी घरखर्च कमी करून सोहनला शिकवलं आणि आज मुलाच्या यशामुळे वडिलांना प्रचंड अभिमान वाटत आहे.
सोहनची वहिनी ममता देवी यांनी सांगितले की, जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा घरची परिस्थिती खूपच वाईट होती, परंतु सोहनच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आज घरची परिस्थिती सुधारली. मेहनतीच्या जोरावर त्याने देशाला वैभव प्राप्त करून दिले आहे, तो अभिमानाचा क्षण आला आहे. आजचा दिवस कुटुंबासाठी खूप आनंदाचा आहे. नातेवाईकांचे सतत फोन येत आहेत, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.