दिव्यास्त्र: अग्नि-५ यशस्वी, डीआरडीओचे मोठे यश; चीन, अर्धा युरोप टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 05:24 AM2024-03-12T05:24:10+5:302024-03-12T05:27:05+5:30
महिला ठरल्या हिरो; पंतप्रधानांनी केले अभिनंदन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या अग्नि-५ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) शास्त्रज्ञांचे सोमवारी अभिनंदन केले. अग्नि-५ अण्वस्त्रे तसेच विविध प्रकारची स्फोटके वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. दिव्यास्त्र या मोहिमेच्या अंतर्गत हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. दिव्यास्त्र मोहिमेची प्रकल्प संचालक एक महिला शास्त्रज्ञ असून अग्नि-५ क्षेपणास्त्र विकसित करण्यात महिलांचा मोठा वाटा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, मल्टिपल टारगेटेबल रि-एन्ट्री व्हेइकल (एमआयआरव्ही) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वदेशी बनावटीचे अग्नि-५ हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
महिला शास्त्रज्ञ संचालक
अग्नि-५ या क्षेपणास्त्राची अण्वस्त्रे व विविध प्रकारची स्फोटके वाहून नेण्याची व त्यांचा अनेक ठिकाणी मारा करण्याची क्षमता आहे. सूत्रांनी सांगितले की, एक महिला शास्त्रज्ञ दिव्यास्त्र या मोहिमेची संचालक आहे. मात्र त्यांच्या नावाचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. अग्नि-५ हे क्षेपणास्त्र स्वदेशी बनावटीच्या एव्हिऑनिक्स तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी या क्षेपणास्त्रात सेन्सर यंत्रणेचा वापर केलेला आहे.
अग्नि-५चा माऱ्याचा पल्ला ५ हजार किमीपर्यंतचा
अग्नि-५ क्षेपणास्त्र ५ हजार किमीपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. अशा प्रकारचे क्षेपणास्त्र भारताकडे असणे आवश्यक होते. या क्षेपणास्त्राच्या माऱ्याच्या टप्प्यात आशिया खंडातील सर्व देश तसेच चीनचा उत्तरेकडील भाग, युरोपचा काही भाग येतो. अग्नि १ ते ४ ही क्षेपणास्त्रे ७०० किमी ते ३५०० किमीपर्यंत मारा करू शकतात. भारत अतिशय प्रगत क्षेपणास्त्रे विकसित करत असून त्यासाठी प्राधान्याने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.