कृष्णविवरांच्या संशोधनासाठी मोहीम महत्त्वाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:29 AM2024-01-02T10:29:23+5:302024-01-02T10:30:38+5:30
माेदी म्हणाले की, नव्या वर्षाची या प्रक्षेपणामुळे उत्तम सुरुवात झाली आहे. हे प्रक्षेपण अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी उत्तम घटना आहे असे सांगून त्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेत असल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या एक्स-रे पोलॅरिमीट उपग्रहाचे इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल त्या संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. कृष्णविवरांच्या संशोधनात ही मोहीम मोठी भूमिका बजावेल, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताची आणखी भरीव कामगिरी होईल, असेही मोदी म्हणाले.
माेदी म्हणाले की, नव्या वर्षाची या प्रक्षेपणामुळे उत्तम सुरुवात झाली आहे. हे प्रक्षेपण अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी उत्तम घटना आहे असे सांगून त्यांनी अंतराळ संशोधन क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेत असल्याबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
यंदाचे वर्ष गगनयान मोहिमेच्या पूर्वतयारीचे : इस्रो
- गगनयान या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी २०२४ सालामध्ये विविध प्रकारच्या चाचण्या होणार आहेत. या नव्या वर्षात गगनयान मोहिमेची पूर्वतयारी करण्यात येईल असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. नव्या वर्षामध्ये इस्रो १२ ते १४ मोहिमांची पूर्वतयारी करणार आहे.
- ऑक्टोबर २०२३मध्ये करण्यात गगनयानसाठी टीव्ही-डी१ किंवा अबॉर्ट मिशन पार पाडण्यात आले. यंदाच्या वर्षात अशा किमान दोन चाचण्या होणर आहेत. निसार मोहिमेसाठी जीएसएलव्ही अग्निबाणाच्या प्रक्षेपणाचीही तयारी सुरू आहे. इन्सॅट-३ डीएससह जीएसएलव्ही काही कालावधीनंतर उड्डाण करेल.
दोन पेलोडची स्वदेशातच निर्मिती
एक्स्पोसॅट या उपग्रहावर असलेले पोलिक्स (पोलारीमीटर इन्स्ट्रुमेंट इन एक्स-रेज) हे उपकरण रामन रिसर्च इन्स्टिट्यूट व एक्सस्पेक्ट (एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी अँड टायमिंग) हे उपकरण बंगळुरू येथील यू. आर. राव उपग्रह केंद्राने तयार केले आहे.
एक्स्पोसॅट मोहिमेमुळे जगभरात सुरू असलेल्या खगोल संशोधनाला अनेक फायदे होणार आहेत. कृष्णविवर, न्यूट्रॉन तारे, गॅलेक्टिक केंद्रक यांच्यासारख्या खगोलीय घटकांवरील क्ष-किरणांच्या ध्रुवीकरणाच्या मोजमापातून मिळालेल्या नव्या माहितीमुळे त्यांच्याबद्दलची भौतिकशास्त्रीय समज आणखी वाढण्याची शक्यता आहे.