Mission Shakti: इस्रोने वाढवली देशाची शान; राजकारणाच्या नादात विसरू नका शास्त्रज्ञांचं योगदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:27 PM2019-03-27T17:27:46+5:302019-03-27T17:29:14+5:30

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यानं, देशानं घेतलेल्या या उत्तुंग भरारीचं राजकारण होणं अपेक्षितच होतं.

Mission Shakti: ISRO, DRDO Scientists make India Proud once again with big success of Mission Shakti | Mission Shakti: इस्रोने वाढवली देशाची शान; राजकारणाच्या नादात विसरू नका शास्त्रज्ञांचं योगदान!

Mission Shakti: इस्रोने वाढवली देशाची शान; राजकारणाच्या नादात विसरू नका शास्त्रज्ञांचं योगदान!

Next
ठळक मुद्देनव्या भारतासाठी अशक्य असं काहीच नाही, हे आपण 'ऑपरेशन शक्ती'द्वारे पुन्हा सिद्ध केलं आहे.इस्रो, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे देशाची मान जगात अभिमानानं उंचावली आहे.

आजवर जगातील केवळ तीन देशांना - अमेरिका, रशिया आणि चीनला जमलेला पराक्रम आज भारताने करून दाखवला. 'हम किसी सें कम नहीं' आणि नव्या भारतासाठी अशक्य असं काहीच नाही, हे आपण 'ऑपरेशन शक्ती'द्वारे पुन्हा सिद्ध केलं आहे. क्षेपणास्त्राच्या मदतीने उपग्रह नष्ट करण्याची शक्ती भारतानं मिळवली आहे. त्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोचं आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओचं मोलाचं योगदान आहे. या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे देशाची मान जगात अभिमानानं उंचावली आहे. त्यासाठी त्यांना सलाम करणं हे प्रत्येक देशवासीयाचं कर्तव्य आहे. 

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यानं, देशानं घेतलेल्या या उत्तुंग भरारीचं राजकारण होणं अपेक्षितच होतं. त्यानुसार ते सुरूही झालंय. इस्रो आणि डीआरडीओची स्थापना काँग्रेसनंच केली होती इथपासून, ते २०१२ मध्येच 'मिशन शक्ती'ची सुरुवात झाली होती, इथपर्यंत बरंच काही लिहिलं-बोललं जातंय. परंतु, या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या धबडग्यात इस्रो, डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची मेहनत आपण विसरता कामा नये. 


आजचं युग हे 4G चं आहे आणि ते हळूहळू 5G, 6G, 7G चं होत जाणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अवकाशाची - म्हणजेच 'स्पेस'ची 'स्पेस' अनन्यसाधारण आहे. शेती, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, आपत्कालीन व्यवस्थापन, दूरसंचार, टीव्ही, हवामानाचा अंदाज या सगळ्या क्षेत्रांत घडत असलेली क्रांती अंतराळातून मिळणाऱ्या मदतीशिवाय शक्यच नाही. थोडक्यात, प्रगतीचा-विकासाचा मार्ग अंतराळातून जातो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा काळात, इस्रोचे शास्त्रज्ञ जे काही नवनवं संशोधन करताहेत, एकापेक्षा एक भारी उपग्रह अवकाशात सोडत आहेत, त्याला तोड नाही. कमीत कमी खर्चात उपग्रह बनवणं, एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठवणं, फक्त आपलेच नाही, तर इतर देशांचे उपग्रह घेऊन जाणं, मंगळापर्यंत मारलेली मजल ही कामगिरी थक्क करणारी आहे. 

अशातच, इस्रो-डीआरडीओने 'मिशन शक्ती' फत्ते केल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. या 'शक्ती'मुळे भारताची अवकाशातील ताकदही प्रचंड वाढली आहे आणि आपण महाशक्ती राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसलोय.


रोजच्या जगण्यातील अवकाशाचं वाढतं प्रस्थ पाहता, पुढची युद्धं ही अवकाशातून लढवली जातील, असं बोललं जातं. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकमध्येही उपग्रहांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. उपग्रहांकडून सगळी माहिती अगदी अचूक आल्यानं नेमकं लक्ष्य भेदता आलं होतं. आता 'मिशन शक्ती'मुळे आपण आपल्याला त्रासदायक ठरणारा उपग्रह क्षेपणास्त्राच्या मदतीने नष्ट करू शकणार आहोत. भारताने स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रानं (A-SAT) आज पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. लो अर्थ ऑरबिटमध्ये ही मोहीम यशस्वी करणं आव्हानात्मक होतं. उपग्रहाचा अचूक वेध घेता आला नसता, तर तो पृथ्वीवरही पडू शकत होता. त्यामुळेच चीननंही ही जोखीम पत्करली नव्हती. पण भारतानं हे आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीही केलं. तसंच, लो अर्थ ऑरबिटमध्येच हा लक्ष्यभेद केल्यानं कचराही अवकाशात फिरत राहिला नाही. त्यातून आपल्या शास्त्रज्ञांची कुशाग्र बुद्धिमत्ताच दिसते. त्यामुळे राजकीय नेत्यांना जो गोंधळ घालायचा तो घालू दे, आपण अभिमानानं म्हणू या 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान!'




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी साधलेला संवादः


Web Title: Mission Shakti: ISRO, DRDO Scientists make India Proud once again with big success of Mission Shakti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.