राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ओबीसींना ट्रस्टमधून वगळणे चूक : उमा भारती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 02:31 PM2020-02-07T14:31:58+5:302020-02-07T14:32:49+5:30
राम मंदिर झाल्यानंतर देशात रामराज्य आणण्याकडे पुढील वाटचाल होईल, अंस सांगितले. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.
नवी दिल्ली - राम मंदिर उभारणीसाठी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या सदस्य आणि अध्यक्षपदावरून भाजपमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आधी अध्यक्षपदावर नाराजी होती. आता सदस्यपदावरून भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राम मंदिर ट्रस्टमध्ये सरकारकडून दलित समाजातील एका व्यक्तीला स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी समाजातील एका व्यक्तीचा समावेश राम मंदिर ट्रस्टमध्ये करायला हवा होता. राम दिर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ओबीसी समाजातील व्यक्तीला ट्रस्टमध्ये न घेणे चुकीचे असल्याचे भारती यांनी म्हटले आहे.
कल्याणसिंह, विनय कटियार आणि आपल्यासह रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी नेत्यांनी केले आहे. परंतु, सरकारने राजकीय व्यक्तीला ट्रस्टमध्ये घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरी राजकारणाबाहेरील एखाद्या ओबीसी व्यक्तीला ट्रस्टमध्ये स्थान द्यायला हवे होते, अशी इच्छा भारती यांनी व्यक्त केली.
सरकारने दलित समाजातून कामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सामील केले आहे. त्यामुळे ओबीसीला देखील संधी द्यायला हवी होती. राम मंदिर आंदोलन सर्व हिंदुंनी केले. परंतु, त्याचे नेतृत्व ओबीसीने केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राम मंदिर झाल्यानंतर देशात रामराज्य आणण्याकडे पुढील वाटचाल होईल, अंस सांगितले. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.