मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 05:22 AM2019-01-08T05:22:11+5:302019-01-08T05:22:38+5:30
गुलाम नबी आझाद : विरोधकांच्या आघाडीत खोडा घालण्याचा प्रकार
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची आघाडी साकारू नये यासाठी त्या पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्याकरिता मोदी सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. बेकायदा खाणकामप्रकरणी समाजवादी पार्टीचे (सपा) नेते अखिलेश यादव यांची सीबीआय करणार असलेली चौकशी म्हणजे भाजपचे सुडाचे राजकारण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी सरकार सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय, प्राप्तीकर खाते या यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. अखिलेश यादव यांच्या विरोधात सीबीआय करीत असलेल्या चौकशीचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रकारचे राजकारण व हुकूमशाही देशात चालू देणार नाही. गेल्या साडेचार वर्षांत त्यांची चौकशी करण्याची बुद्धी सरकारला झाली नाही.
आता लोकसभा निवडणुका जवळ आल्यानंतर अचानक बेकायदा खाणकाम प्रकरणाची आठवण झाली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विरोधातही अनेक पक्ष एकवटले होते; मात्र त्यांनी मोदी सरकारप्रमाणे विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर केला नव्हता, असे ते म्हणाले.
हुकूमशाही राजवट संपवा- केजरीवाल
च्अखिलेश यादव यांच्या मागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या मोदी सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीका केली आहे. ही हुकूमशाही प्रवृत्तीची व लोकशाहीविरोधी राजवट संपुष्टात आणा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.