'स्मृती इराणींकडून खासदार निधीचा दुरुपयोग'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 03:33 AM2019-03-15T03:33:36+5:302019-03-15T03:33:49+5:30
काँग्रेस नेत्यांचा आरोप; राजीनाम्याची मागणी
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : खासदार निधीच्या दुरुपयोगावरून केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी वादात सापडल्या आहेत. आपल्या निकटवर्तीयांना नियम डावलून ६ कोटी रुपयांचे पेमेंट केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. हे प्रकरण २०१७ मध्ये चर्चेत आले; पण संबंधित मंत्रालयाने आणि विभागाने काही कारवाई करण्याऐवजी पूर्ण प्रकरणच बाजूला ठेवून दिले. कॅगच्या अहवालात असे म्हटले आहे की, एका मजूर कामदार को. आॅपरेटिव्ह सोसायटीला २३२ कामांचा ठेका विना टेंडर देण्यात आला. त्यासाठी ५.९४ कोटी रुपयांचा निधी दिला. याबाबतच्या पूरकपत्रात मात्र ८४.५३ लाख रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख आहे आणि तो खोटा असल्याचे सांगितले जाते.
खासदार निधीबाबत स्मृती इराणी यांचा रेकॉर्ड संशयाच्या भोवऱ्यात आहे. मंत्रालयाचे रेकॉर्ड असे सांगते की, वर्ष २०१८-२०१९ मध्ये इराणी यांच्या खासदार निधीचे दोन हप्ते रोखण्यात आले आहेत. कारण, अद्याप त्यांनी निधीच्या उपयोगाचे प्रमाणपत्र दिले नाही. इराणी यांना २० जून २०१८ रोजी २.५० कोटींचा अंतिम हप्ता देण्यात आला होता. काँग्रेसचे नेते अमित चावडा यांनी इराणी यांच्यावर खासदार निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. याबाबत आरोप सुरू झाले तेव्हा इराणी यांनी १२ जुलै २०१७ रोजी आनंद जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या खासदार निधीतून झालेल्या कामांचा प्रगती अहवाला मागविला. गुजरातमधील काँग्रेसचे नेते शक्तीसिंह गोहिल यांनी हे प्रकरण पुन्हा एकदा नव्याने समोर आणले आहे.
याबाबत दस्तऐवज सादर करीत शक्तीसिंह यांनी इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि सवाल केला आहे की, जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी २० जून २०१७ रोजी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहून भ्रष्टाचाराची तक्रार केली तेव्हा कारवाई का केली नाही? त्यानंतर कॅगनेही नियमांच्या उल्लंघनाबाबत भाष्य केले होते.