बलात्कारविरोधी कायद्याचा महिला करताहेत गैरवापर; उत्तराखंड उच्च न्यायालयाचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 09:59 AM2023-07-24T09:59:19+5:302023-07-24T09:59:34+5:30
सध्या पुरुष जोडीदाराशी मतभेद झाले की महिला बलात्काऱ्याला शिक्षा देणाऱ्या कायद्याचा शस्त्र म्हणून गैरवापर करत असल्याचे उत्तराखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
नैनिताल : सध्या पुरुष जोडीदाराशी मतभेद झाले की महिला बलात्काऱ्याला शिक्षा देणाऱ्या कायद्याचा शस्त्र म्हणून गैरवापर करत असल्याचे उत्तराखंड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती शरदकुमार शर्मा यांनी ५ जुलै रोजी एका पुरुषाविरुद्धची फौजदारी कारवाई रद्द करताना हे निरीक्षण नोंदवले.
या प्रकरणात एका महिलेने लग्नास नकार दिल्यानंतर पुरुषावर बलात्काराचा आरोप केला होता. २००५ पासून दोघेही परस्पर संमतीने संबंध ठेवत होते.
न्यायधीश शर्मा म्हणाले की, जर एखाद्या पक्षाने लग्न करण्यास नकार दिला असेल तर प्रौढांमधील संमतीने ठेवण्यात आलेले संबंध हे बलात्कार म्हणता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार म्हटले आहे. मात्र, असे असतानाही महिला बलात्काऱ्याला शिक्षा देणाऱ्या कायद्याचा (कलम ३७६) शस्त्र म्हणून गैरवापर करत आहेत.
काय आहे तक्रारीत?
महिलेने ३० जून २०२० रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, आरोपी २००५ पासून तिच्यासोबत सहमतीने लैंगिक संबंध ठेवत होता.
दोघांपैकी एकाला नोकरी लागताच लग्न करू असा दोघांनी एकमेकांना शब्द दिला होता.
मात्र, आरोपीने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केले. लग्नानंतरही या दोघांमधील नाते कायम राहिले होते, असा दावा महिलेने केला आहे.