सासरच्यांवर दबावासाठी कायद्याचा दुरुपयोग: ओडिसा कोर्ट; नणंदेविरुद्धची कारवाई रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 08:19 AM2023-06-09T08:19:52+5:302023-06-09T08:20:06+5:30
क्षुल्लक कारणांवरून वैवाहिक वादाचे खटले दाखल होत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, कटक : पतीच्या कुटुंबावर दबाव आणण्यासाठी हत्यार म्हणून सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा अनेकदा वापरला जातो, असे म्हणत ओडिशा हायकोर्टाने वेगळ्या घरात राहणाऱ्या तक्रारदाराच्या नणंदेविरुद्धची कारवाई रद्द केली.
जून २०१७ मध्ये विश्वरूपा मोहंती यांच्या भावाचे लग्न झाले. २०१८ मध्ये वधूने आरोप केला की, हुंड्याच्या मागणीसाठी पती आणि इतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. भारतीय दंड विधान कलम ४९८-अ आणि हुंडाबंदी कायद्याच्या कलमांखाली पती आणि विश्वरूपासह सासरच्या इतर नातलगांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तपासानंतर दोषारोपपत्र दाखल केले.
विश्वरूपाने तिच्याविरुद्धचा गुन्हा चुकीचा आहे, ती विवाहित असल्याने वेगळ्या घरात राहते, या मुद्यावर फौजदारी कारवाई रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने म्हटले आहे की, कलम ४९८-अ अंतर्गत विवाहितेच्या छळाचा गुन्हा अनेकदा सासरच्या मंडळींविरुद्ध दबावतंत्र म्हणून दाखल केला जातो. अनेकदा अगदी दूरच्या ठिकाणी वेगळे राहणाऱ्या नातेवाइकांना गुन्ह्यांत ओढून दबाव आणला जातो, असे म्हणत विश्वरूपाविरुद्धची कारवाई रद्द केली. क्षुल्लक कारणांवरून वैवाहिक वादाचे खटले दाखल होत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली.
न्यायालयाने नोंदविलेली निरीक्षणे
हे खरे आहे की हुंड्यासाठी छळाच्या खऱ्या प्रकरणात नवरा, सासू, नणंद, भावजय आणि सासरची इतर मंडळी महत्त्वाची भूमिका बजावतात. पती-पत्नीच्या वादाची प्रकरणे हाताळताना न्यायालयाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जेणेकरून खरा खटला व त्रास देण्यासाठी दाखल केलेला गुन्हा वेगळा करता येईल. - न्या. जी. सतपथी.