'हा कायद्याचा गैरवापर', अनेकांवर बलात्काराचा खटला दाखल करणाऱ्या महिलेला कोर्टाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:59 IST2025-03-04T16:58:52+5:302025-03-04T16:59:15+5:30

सुप्रीम कोर्टाने निवृत्त लष्करी अधिकाऱ्याविरोधात दाखल केलेला खटला रद्द केला.

misuse of legal process, SC slams a woman who had filed rape cases against several men | 'हा कायद्याचा गैरवापर', अनेकांवर बलात्काराचा खटला दाखल करणाऱ्या महिलेला कोर्टाने फटकारले

'हा कायद्याचा गैरवापर', अनेकांवर बलात्काराचा खटला दाखल करणाऱ्या महिलेला कोर्टाने फटकारले

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने एका बलात्काराच्या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला दिलासा देत न्यायालयाने त्यांच्यावरील बलात्काराचा खटला रद्द केला आहे. सुनावणीदरम्यान, न्यायालयाला असे आढळून आले की, संबंधित महिलेने अशाच प्रकारचे आरोप करत आणखी 8 लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. न्यायालयाने महिलेला नोटीस पाठवून बाजू मांडण्याची संधी दिली होती, मात्र तिने तसे केले नाही.

सविस्तर माहिती अशी की, सेवानिवृत्त आर्मी कॅप्टन राकेश वालिया यांच्याविरुद्ध एका 39 वर्षीय महिलेने 2021 मध्ये दिल्लीतील मेहरौली पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. गुंगीचे औषध पाजवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला होता. यानंतर वालिया यांनी पैसे उकळण्याचा डाव असल्याचे सांगत, दिल्ली उच्च न्यायालयाकडे प्रकरण रद्द करण्याची मागणी केली, परंतु उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही.

यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांनी सांगितले की, महिलेने एफआयआर दाखल केला, पण तपासात कधीही सहकार्य केले नाही. या सुनावणीदरम्यान महिलेने आणखी 8 जणांविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे एफआयआर दाखल केल्याचेही समोर आले.

यानंतर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व बाबींचा विचार केल्यानंतर हा न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाकडूनच दिलासा मिळायला हवा होता, अशी प्रतिक्रिया न्यायालयाने दिली. या टिप्पणीनंतर न्यायमूर्तींनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द केला.


 

Web Title: misuse of legal process, SC slams a woman who had filed rape cases against several men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.