भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 08:42 PM2024-11-12T20:42:48+5:302024-11-12T20:43:59+5:30
Mithun Chakraborty News: स्थानिक भाजप नेत्यांनी चोराला पाकिट परत करण्याची विनंती केली.
Jharkhand Assembly Election 2024 :झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी होणार असून, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होईल. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती प्रचारासाठी धनबादला पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या कुणीतरी त्यांचे पाकिट मारले.
ही बातमी समजताच भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यांनी मंचावरुनच पर्स परत करण्याचे आवाहन केले. दरम्यान, त्या पर्समध्ये किती पैसे होते, कोणती कागदपत्रे होती, याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, मिथुन चक्रवर्ती यांची पर्स चोरीला गेल्याच्या प्रकरणाचा काँग्रेसने खरपूस समाचार घेतला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ बिहार काँग्रेसने शेअर केला आहे. X हँडलवर व्हिडिओ शेअर करताना पक्षाने लिहिले की, भाजपच्या मंचावरून डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचे पाकीट चोरीला गेले.
BJP की स्टेज से "डिस्को डांसर" मिथुन चक्रवर्ती का बटुआ चोरी 😂 pic.twitter.com/AoGKfzTFFL
— Bihar Congress (@INCBihar) November 12, 2024
मिथुन चक्रवर्ती हे झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करत आहेत. सोमवारी त्यांनी माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी आणि भाजप उमेदवार मीरा मुंडा यांच्या समर्थनार्थ सिंहभूममध्ये प्रचार केला. मंगळवारी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी धनबादला पोहोचले होते. झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी (13 नोव्हेंबर) मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.