मिश्रण जुन्या-नव्यांचे; सर्वाधिक मंत्रिपदे यूपी-महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 03:13 AM2019-05-31T03:13:44+5:302019-05-31T03:14:24+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. महाराष्ट्राच्या सुरेश प्रभू व डॉ. सुभाष भामरे यांना मात्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात बरेच जुने चेहरे घेतले असले तरी पक्षाध्यक्ष अमित शहा, देशाचे निवृत्त परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनाही स्थान दिले आहे. हे दोघे आता अरुण जेटली व सुषमा स्वराज यांचे स्थान घेण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. महाराष्ट्राच्या सुरेश प्रभू व डॉ. सुभाष भामरे यांना मात्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही.
सर्वाधिक मंत्रिपदे यूपी-महाराष्ट्रात
मोदी मंत्रिमंडळात सर्वाधिक ८ मंत्रिपदे उत्तर प्रदेशला मिळाली आहेत. त्यानंतर महाराष्ट्राला ७, बिहारला ६, मध्य प्रदेशला ४, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, हरयाणा यांना प्रत्येकी ३, पंजाब, झारखंड, दिल्ली, ओडिशा, प. बंगाल यांना प्रत्येकी २ मंत्रिपदे मिळाली आहेत. या शिवाय तमिळनाडू, उत्तराखंड, गोवा, जम्मू-काश्मीर, अरूणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ, छत्तीसगड व आसाम यांना प्रत्येकी १ मंत्रिपद मिळाले आहे.
राजनाथ सिंह, भाजप । उत्तर प्रदेश
मंत्रिमंडळात स्थान का?
1. भाजपचे माजी अध्यक्ष. पक्षसंघटनेत महत्त्वाचे स्थान. २0१४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यात मोठा वाटा.
2. गृहमंत्री म्हणून काश्मीरमधील दहशतवाद तसेच अन्य राज्यांतील नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न.
3. गृह खात्यावर उत्तम पकड. पाकिस्तानातून होणाºया घुसखोरीला आळा.
अमित शहा, भाजप । गुजरात
1. भाजपचे अध्यक्ष. लोकसभा निवडणुकांत प्रचंड बहुमत मिळवून देण्यात सिंहाचा वाटा.
2. पक्षसंघटनेवर पकड, रणीनीती ठरवण्यात व ती अंमलात आणण्यात हातखंडा. कार्यकर्त्यांशी उत्तम संबंध
3. मोदी यांच्या विश्वासातील नेते. मोदी यांच्यासमवेत गुजरातच्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव
अरविंद सावंत, शिवसेना । महाराष्ट्र
1. शिवसेनेचे उपनेते आणि पक्षाचे प्रवक्ते. दक्षिण मुंबईतून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवड. शिवसेनेचे सरकारमध्ये प्रतिनिधीत्व
2. महानगर टेलिफोन कर्मचाऱ्यांचे तसेच स्थानिय लोकाधिकार समितीचे ज्येष्ठ नेते.
3. विधान परिषदेवरील कामाचा अनुभव. मध्यमवर्गाला शिवसेनेजवळ आणण्याचे प्रयत्न.
नितीन गडकरी, भाजप । महाराष्ट्र
1. माजी पक्षाध्यक्ष. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री उत्कृष्ट काम. रस्ते व परिवहन तसेच जलवाहतूक व गंगा शुद्धीकरण प्रकल्पात धडाकेबाज कामगिरी.
2. राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना वेग दिला. गंगा फ्लायओव्हर, ब्रिज यांची कामे त्यांच्या झपाट्याने मार्गी लागली.
3. ग्रामसडक योजना यशस्वीरित्या राबविण्यात सिंहाचा वाटा.
पीयूष गोयल, भाजप । महाराष्ट्र
1. कायदा व अर्थशास्त्राचे अभ्यासक, सुरुवातीपासून भाजपमध्ये सक्रिय.
2. कोळसा खाणी ऊ र्जा, रेल्वे तसेच अर्थमंत्री म्हणून मोदी मंत्रिमंडळात उत्तम कामगिरी. सौर ऊ र्जेच्या अनेक योजना. उज्ज्वला व उन्नत ज्योती (स्वस्तात एलईडी दिवे) योजनेचा गरिबांना लाभ.
3. विद्वान अशी ओळख. पक्षाची रणनीती ठरवण्यात मोठा वाटा.
प्रकाश जावडेकर, भाजप । महाराष्ट्र
1. मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून कामाचा अनुभव. पर्यावरण, वने व हवामान या खात्यातही काम. आधी पक्षाचे प्रवक्ते म्हणून उत्तम कामगिरी.
2. राज्यसभा सदस्य. उत्तम वक्ते. विद्यापीठ अनुदान आयोगात बदलांचे प्रयत्न.
3. अभाविपपासून भाजपशी संबंध. शिक्षण व परीक्षा पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न.
महाराष्ट्रातील तीन राज्यमंत्री
रावसाहेब दानवे; भाजप । महाराष्ट्र
भाजपचे प्रदेशाध्यक्ष. जालन्याचे पाचव्यांदा खासदार. भाजप-शिवसेना युती विजयी करण्यात मोठा वाटा. मोदी सरकारमध्ये काही काळ ग्राहक तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे काम. त्यामुळेच राज्यमंत्रीपद. सरपंचपदापासून आमदार, खासदार, मंत्री अशी वाटचाल.
रामदास आठवले; रिपाइं । महाराष्ट्र
राज्यसभेचे सदस्य व दुसऱ्यांदा राज्यमंत्रीपद.राज्यातील आंबेडकरी जनतेचे नेते. रालोआचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मंत्रिमंडळात स्थान मिळणे अपेक्षितच होते. पक्षाचे एकमेव खासदार असल्यामुळे पुन्हा त्यांचेच नाव निश्चित झाले.
संजय धोत्रे; भाजप । महाराष्ट्र
अकोल्यातून सलग चौथ्यांदा खासदार. भाजपला प्रचंड विजय मिळवून देणाºया विदर्भातीन नेत्याला प्रतिनिधीत्व. गेल्या वेळी विदर्भातील हंसराज अहीर राज्यमंत्री होते. वंचित बहुजन आघाडीच्या अॅड प्रकाश आंबेडकर यांचा केला पराभव.
मोदींच्या मंत्रिमंडळात सहा महिला
मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहा महिलांना स्थान देण्यात आले आहे. त्या निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, हरसिमरत कौर या तीन कॅबिनेट मंत्री असतील. तर साध्वी निरंजन ज्योती, रेणुका सिंग सरूता, देवश्री चौधरी यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
घटक पक्षांना चार मंत्रिपदे
भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असले तरी चार घटक पक्षांना चार मंत्रिपदे मिळाली आहेत. शिवसेना, लोक जनशक्ती पार्टी, अकाली दल यांना कॅबिनेट मंत्रिपद तर रिपाइंला राज्यमंत्रिपद मिळाले आहे.
30 मंत्र्यांना वगळले
सुषमा स्वराज आणि अरूण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिपद स्वत:हून नाकारले असले तरी त्यांच्यासह गेल्या मंत्रिमंडळात असलेल्या एकूण ३० मंत्र्यांना यावेळी स्थान मिळालेले नाही. जे. पी. नड्डा, मनेका गांधी, जयंत सिन्हा, राज्यवर्धन राठोड, विजय गोयल, राम कृपाल यादव, जुआल ओराम, राजीव प्रताप रुडी, अनंत हेगडे, महेश शर्मा, अनुप्रिया पटेल, राधा मोहन सिंग, चौधरी विरेंद्र सिंग, के. अल्फोन्स, एस. एस. अहलुवालिया यांच्यासह ३० जणांना यावेळी नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.