मिझोराममध्ये जोरदार प्रचार सुरू; दारूबंदी, घुसखोर कळीचे मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:36 AM2018-11-21T06:36:59+5:302018-11-21T06:37:34+5:30
मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही काही सभा घेतील.
- असिफ कुरणे
ऐझॉल : मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही काही सभा घेतील. सध्याच्या प्रचारात राज्यातील पायाभूत सुविधांच्या अवस्थेबरोबरच दारूबंदी व अन्य देशांतून बेकायदेशीरपणे आलेले नागरिक हे मुद्दे ठळकपणे दिसतात.
माजी मुख्यमंत्री जोरमथंगा यांनी दारूबंदीसाठी आक्रमकपणे आवाज उठविला आहे. तर काँग्रेस पूर्ण बंदीच्या विरोधात आहे. मिझोरममध्ये १९९७ पासून पूर्णपणे दारूबंदी होती. चर्च व स्थानिक सामाजिक संघटनांच्या
पुढाकारामुळे ही बंदी लागू झाली होती. पण काँग्रेसचे मुख्यमंत्री लाल थनहवला यांच्या सरकारने २०१४ मध्ये दारूबंदी हटवल्याने जानेवारी २०१५ पासून राज्यात नियमबद्ध दारूविक्री सुरू झाली. या निर्णयामुळे चर्च व सामाजिक संघटनांमध्ये नाराजी आहे.
नव्या कायद्यानुसार महिन्याला ६ बाटल्या विदेशी मद्य, तर १० बाटल्या बीअर घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे दारूबंदी पूर्णपणे हटवली, असे म्हणता येत नसल्याचा काँग्रेस
सरकारचा दावा आहे. तर बंदी हटवल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप विरोधी मिझो नॅशनल फ्रंट, जोरम पिपल्स मुव्हमेंट यांनी केला आहे.
दारूबंदी हटवल्यानंतर राज्यात ५०० पोलीस कर्मचारी, ५ हजार
लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप जोरामथंगा यांनी केला. मार्च २०१७ पर्यंत राज्यात ११ लाख लोकसंख्येपैकी ८० हजार दारू परवानाधारक होते. याआधी १९९७ मध्ये दारूबंदी लागू करूनही त्यावेळचे मुखमंत्री लाल थनहलवा यांना सत्ता गमवावी लागली होती. त्यांनीच आपल्या २०१३च्या सलग दुसºया टर्ममध्ये दारूबंदी उठवली. यामागे राज्यातील वाढती द्राक्षशेती कारणीभूत आहे. द्राक्षशेतीमुळे वाइन उद्योगवाढीस चालना मिळत असल्याचे दारुबंदीचे विरोधक दावा करतात.
बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार या देशांतून होणारे बेकायदा स्थलांतर हाही मिझोरम निवडणुकीतील कळीचा मुद्दा बनला आहे. एका अहवालानुसार सध्या मिझोराममध्ये १० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित लोक आहेत. बांग्लादेशातून आलेल्या चकमा निर्वासितांना बाहेर काढण्याची मागणी स्थानिक सामाजिक व विद्यार्थी संघटनांनी पंतप्रधानांकडे केली होती.
८७ टक्के मिझोवासी प्रेस्बिटेरियन चर्चशी जोडलेले आहेत. दैनंदिन जीवन, सामाजिक, राजकीय गोष्टींवर चर्चचा प्रभाव सहजपणे दिसतो. इथे चर्च फक्त प्रवचन देण्यापुरते मर्यादित नसून राजकीय घडामोडीतही सहभागी होत असते.
मिझो संस्कृतीवर घाला - राहुल गांधी
ऐझॉल : मिझोरामची संस्कृती, भाषा आणि इतिहास संपवून टाकायला निघालेल्या भाजपा आणि रा. स्व. संघाला मिझोरम नॅशनल फ्रंट मदत
करीत असल्याबदनदल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एझॉल
येथील मंगळवारच्या सभेत दु:ख व्यक्त केले. हे दोन्ही पक्ष आपण एकमेकांशी निवडणुकीनंतर समझोता करणार नाही, असे सांगत असले तरी त्यात तथ्य नाही, असा दावा राहुल यांनी केला.