मिझोराममध्ये ‘रेमल’ने वाताहत; दगडखाण ढासळल्याने १३ मृत्यू, अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 07:52 AM2024-05-29T07:52:33+5:302024-05-29T07:53:39+5:30

अतिवृष्टी व भूस्खलनामुळे एकूण २२ ठार

Mizoram hit by Remal cyclone 13 dead, many missing in stone quarry collapse | मिझोराममध्ये ‘रेमल’ने वाताहत; दगडखाण ढासळल्याने १३ मृत्यू, अनेक जण बेपत्ता

मिझोराममध्ये ‘रेमल’ने वाताहत; दगडखाण ढासळल्याने १३ मृत्यू, अनेक जण बेपत्ता

आयझॉल : मिझोराममध्ये मंगळवारी ‘रेमल’ चक्रीवादळानंतर अतिवृष्टी व भूस्खलनामुळे किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता आहेत. त्यात आयझॉल जिल्ह्यात दगडखाण ढासळून दोन अल्पवयीन मुलांसह किमान १३ जण ठार झाले, तर आठ जण बेपत्ता झाल्याचे मिझोराम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने  सांगितले.

आयझॉलच्या मेल्थम व हॅलिमेन भागात सकाळी सहाच्या सुमारास दगडखाण ढासळली. भूस्खलनामुळे अनेक घरे व कामगार छावण्यांना फटका बसला. त्याखाली किमान २१ लोक गाडल्या गेले. त्यातील १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, मृतांत एका चार वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेत झालेल्याजीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.

आसाम, मणिपूरमध्ये जनजीवन विस्कळीत 

आसाममध्ये मुसळधार पावसाने वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर १७ जखमी झाले. लखीमपूरमध्ये निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पात झालेल्या भूस्खलनात एकाचा, तर मोरीगावमध्ये रिक्षावर झाड पडल्याने १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 

मणिपूरच्या अनेक भागांत मंगळवारी संततधार मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील आंद्रो पार्किंग, चेकॉन, महाबली आणि वांगखेई येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाले. 

Web Title: Mizoram hit by Remal cyclone 13 dead, many missing in stone quarry collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.