राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 03:01 PM2024-05-29T15:01:24+5:302024-05-29T15:01:53+5:30
Lok Sabha Elections 2024 : यासंदर्भात खासदार के वनलालवेना यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांना पत्र लिहिले आहे.
मिझोरम : राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मिझोरमचे राज्यसभा खासदार के वनलालवेना यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. १९ एप्रिल रोजी मिझोरामच्या एकमेव लोकसभा जागेसाठी मतदान झाले. तेव्हा बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पोलीस निवडणूक ड्युटीवर तैनात होते. त्यामुळे पोलीस मतदान करू शकले नाहीत, असे खासदार के वनलालवेना यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात खासदार के वनलालवेना यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, सध्या मिझोराम सशस्त्र पोलिसांच्या १५ तुकड्या आहेत. ज्यामध्ये १०४७ कर्मचारी आहेत. हे पोलीस बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणूक कर्तव्यावर तैनात आहेत. तसेच, पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप खासदार के वनलालवेना यांनी केला.
मिझोरम पोलिसांच्या नोडल अधिकाऱ्याने आधीच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांना मतदानासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. तांत्रिक कारणांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मतदान करू देता आले नाही, अशी खंत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्याचे खासदार के वनलालवेना यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने ६ एप्रिलला उत्तर पाठवले
दरम्यान, राज्य निवडणूक विभागाने सांगितले की, सीईओ कार्यालयाने २८ मार्च रोजी बिहार आणि उत्तर प्रदेशमधील त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी तैनात असलेल्या राज्य सशस्त्र पोलीस दलाच्या (एसएपीएफ) १२ तुकड्यांना पोस्टल मतपत्रिका पाठवण्याच्या शक्यतेबद्दल विचारले होते. निवडणूक आयोगाने ६ एप्रिल रोजी आपले उत्तर पाठवले आणि सांगितले की, राज्याबाहेरील त्यांच्या ड्युटी स्टेशनवरील पोलिसांना टपाल मतपत्रिका पाठवण्याची परवानगी नाही, कारण त्यांना त्यांच्या मूळ राज्यातील सुविधा केंद्रात मतदान करावे लागते.