आमदार ५९ व्या वर्षी कॉलेजात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:27 PM2018-07-22T23:27:45+5:302018-07-22T23:28:16+5:30
पदवीसाठी प्रवेश; फूलसिंह मीणा करणार स्वप्न साकार
जयपूर : लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर घरच्या जबाबदाऱ्या स्वीकारुन त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले. मात्र, आता वयाच्या ५९ व्या वर्षी पुन्हा एकदा शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती प्रबळ झाली आणि ते शिक्षणाकडे वळले. ही प्रेरणादायी घटना आहे भाजपचे उदयपूर ग्रामीणचे आमदार फूलसिंह मीणा यांची.
राजस्थानातील या आमदारांनी आपल्या भागातील मुलींना शिक्षण देण्यासाठी मोहीम चालविली. त्यानंतर आपल्या चार शिक्षित मुलींच्या सांगण्यावरुन स्वत: १० वी आणि १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. आता ते पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहेत. याबाबत फूलसिंह मीणा सांगतात की, सैन्यात कार्यरत असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत आपण शेती आणि कुटुंबाचे पालनपोषण केले.
त्यांनी २०१३ मध्ये राजकारणात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’मोहिमेंतर्गत आदिवासी भागातील मुलींना शिक्षित करण्याचा विडा उचलला. एससी वर्गाच्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाºया विद्यार्र्थिनींना आमदार निधीतून उदयपूर ते जयपूर विमानप्रवासाची संधी देण्याची घोषणा केली. २०१६ मध्ये अशा दोन विद्यार्थीनींना मोफत विमान प्रवासाची संधी दिली.
मीणा म्हणाले की, या योजनेचे सुरुवातीचे परिणाम अतिशय उत्साहपूर्ण आहेत. आता या योजनेचा विस्तार करत एससी वर्गाच्या मुलींऐवजी सामान्य वर्ग केला आहे. दुसºयांना शिक्षणासाठी पे्ररित करताना आपण स्वत: शिक्षित नसल्याचे शल्य होते. लहानपणी आपण सातवीपर्यंतच शिक्षण घेतले होते. त्यामुळे आपण पुन्हा एकदा शिक्षणाच्या मार्गावर चालण्याचे ठरविले आहे. (वृत्तसंस्था)