तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग महाराष्ट्रात हे कसं घडू शकतं?; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 03:50 PM2022-05-13T15:50:48+5:302022-05-13T19:05:28+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसेने करणार आहेत की औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहायला जाणार आहेत, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. अमरावतीमधील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी देखील ओवेसी यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसेने करणार आहेत की औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहायला जाणार आहेत, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. ओवेसी इथे आले आणि औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहून गेले. माझ्या राजकीय जीवनात त्या कबरीवर कोणी गेल्याचं ऐकलं नव्हतं. मात्र ठाकरे सरकार आल्यावर हे पहिल्यांदाच घडलं, अशी टीका रवी राणा यांनी केली. तसेच तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग तुमच्या राज्यात असं कसं काय घडू शकतं, असा सवालही रवी राणांनी उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली- माझ्या राजकीय जीवनात औरंगजेबच्या कबरीवर कोणी गेल्याचं ऐकलं नव्हतं. मात्र ठाकरे सरकार आल्यावर हे पहिल्यांदाच घडलं, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली. pic.twitter.com/csYZDbYhkW
— Lokmat (@lokmat) May 13, 2022
इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, दरगाहवर जाणे आणि तेथे जाऊन 'दरूद शरीफ' पडणे ही आमची संस्कृती आहे. ओवेसी यांनी जाणीवपूर्वक औरंगजेब यांच्याच कबरीवर पुष्प अर्पण केले नाही, तर या भागातील विविध थोर सुफींच्या दरगाहमध्ये जाऊन चादर-पुष्प अर्पण केले. कोणतेही कारण नसताना विरोधकांकडून वाद उकरून काढण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या- ओवेसी
कुत्रे भुंकत आहेत, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या. कुत्रे भुंकत असतात. पण, वाघ शांतपणे निघून जात असतो. ते जाळं विणत आहेत, तुम्ही त्यात फसायचं नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही, असं एमआयएमचे आमदार आणि नेते अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले. त्यांनी आज औरंगाबादमधील जनेतला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी हिंदुस्तान झिंदाबाद असे म्हणत, हा देश जेवढा तुमचा आहे, तेवढाच आमचाही आहे असं त्यांनी सांगितले. या देशात आपण प्रेमानं राहूयात, असेही अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले.