महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन?; शिवसेना खासदार संजय राऊतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:08 AM2022-07-28T10:08:16+5:302022-07-28T10:13:44+5:30
भाजपाला शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान भाजपाचं होतं. त्यात जे यश त्यांना आले हे दिर्घकाळ टिकणार नाही असंही संजय राऊत म्हणाले.
नवी दिल्ली - सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिन्यातून ५ वेळा दिल्लीत येतायेत. त्यामुळे महाराष्ट्रात गोंधळ आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीत यावं लागलं नाही. शिवसेनेचे हायकमांड मुंबईतच, दिल्लीतील नेतेही मुंबईत येऊन चर्चा करतात. मात्र आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने दिल्लीला जातात. पाचवेळा दिल्लीत आले. कदाचित मुख्यमंत्र्यांचा मुक्काम दिल्लीत हलवणार का? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते गडचिरोलीत पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. गेल्या महिन्यापासून २ जणांचं मंत्रिमंडळ राज्यात आहे. शिंदे गटाला काय मिळतेय हा संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा खेळखंडोबा झाला आहे. या गटाने शिवसेनेतून बाहेर काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयात संविधानाविरोधात न्यायमूर्ती निकाल देणार नाही याची खात्री असल्याने १६ आमदार १० व्या शेड्युल्डनुसार अपात्र ठरतील हे नक्की आहे. त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसं म्हणवणार असा टोला राऊतांनी लगावला.
तसेच दुसऱ्या पक्षात जायला किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची कल्पना आम्हाला आहे. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन झाले तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. शिवसेना सर्व निवडणुका लढवणार आहे. भाजपाला शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान भाजपाचं होतं. त्यात जे यश त्यांना आले हे दिर्घकाळ टिकणार नाही असंही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान सतत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत यावं लागते. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान-अभिमानाला ठेच लागते. एकतर आमदारांना अपात्र ठरवलं जाईल किंवा त्याआधी आमदारांना इतर पक्षात विलीन व्हावं लागेल. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दिवसेंदिवस पुढे जाताना दिसेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल द्वेष, तिरस्कार शिंदे गटातील आमदारांमध्ये दिसतोय. परंतु हा द्वेष, तिरस्कार महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या मनात नाही. भावनेच्या भरात, काहींना फसवून शिंदे गटात सामील केलेय. त्यातील काही आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ताबदल होईल असा दावा संजय राऊतांनी केला आहे.