आमदाराचा आत्महत्येचा प्रयत्न, ओडिशा विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी, विरोधी आमदार आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 07:36 AM2021-03-17T07:36:15+5:302021-03-17T07:36:58+5:30
सकाळी १०.३० वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच, बिजद व विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी केली. त्यामुळे गदारोळ झाला.
भुवनेश्वर : धान खरेदीतील ढिसाळ व्यवस्थापनावरून भाजप आमदाराने विधानसभेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण विधानसभेच्या सभागृहात सलग चौथ्या दिवशीही गाजले.
सत्तारूढ बिजू जनता दलाचे सदस्य व विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या गदारोळामुळे विधानसभा अध्यक्ष एस.एन. पात्रो यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत स्थगित केले. सकाळी १०.३० वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच, बिजद व विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन नारेबाजी केली. त्यामुळे गदारोळ झाला. विधानसभेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भाजप आमदाराने माफी मागावी, अशी सत्ताधारी सदस्यांची मागणी होती. देवगढचे भाजप आमदार सुभाष पाणिग्रही यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे राज्य व सभागृहाची प्रतिमा मलीन झाली आहे, असे बिजद आमदारांचे म्हणणे होते. सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोद प्रमिला मलिक यांनी सांगितले की, जोपर्यंत पाणिग्रही हे माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाहीत.
विरोधी पक्षनेते पी.के. नाईक यांनी बिजद सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करताना म्हटले आहे की, धान खरेदीतील ढिसाळ व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी माफी मागितली पाहिजे. काँग्रेस सदस्यांनीही विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन विरोध दर्शविला व सर्व शेतकऱ्यांचे धान खरेदी करावे, अशी मागणी केली. काँग्रेसचे प्रतोद ताराप्रसाद बहिनीपती यांनी सांगितले की, जोपर्यंत शेतकऱ्यांचे म्हणणे सरकार ऐकत नाही, तोपर्यंत आम्ही विरोध प्रकट करीत राहू.
या गदारोळानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत स्थगित केले. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली, परंतु काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.