‘मनरेगा’तून केले नदीचे पुनरुज्जीवन!

By admin | Published: May 9, 2017 02:01 AM2017-05-09T02:01:26+5:302017-05-09T02:01:26+5:30

केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील बुधनूर ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील कुट्टमपेरूर या मृतप्राय झालेल्या नदीचे ‘मनरेगा’

'MNREGA' river revived! | ‘मनरेगा’तून केले नदीचे पुनरुज्जीवन!

‘मनरेगा’तून केले नदीचे पुनरुज्जीवन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
थिरुवनंतपूरम : केरळच्या अलापुझा जिल्ह्यातील बुधनूर ग्रामपंचायतीने त्यांच्या गावातील कुट्टमपेरूर या मृतप्राय झालेल्या नदीचे ‘मनरेगा’ योजनेच्या मजुरीतून पुनरुज्जीवन करून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. गरजूंना रोजगार देण्यासोबतच स्थानिक लोकांना लाभ होईल अशी स्थायी स्वरूपाची काम करण्याचा ‘मनरेगा’चा उद्देशही यामुळे सफल झाला आहे.
बुधनूर पंचायतीचे प्रमुख अ‍ॅड. पी. विश्वंभर पन्निकर यांनी सांगितले की, कुट्टपेरूर नदीचे ‘मनरेगा’तून पुनरुज्जीवन करण्याचे डिसेंबर २०१६मध्ये ठरविण्यात आले. त्याच्या पुढच्या महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ७०० गावकऱ्यांनी आणि प्रामुख्याने महिलांनी ३० हजार मानवी तास काम करून नदी पात्रातील सर्व गाळ, झाडेझुडपे व कचरा साफ केला आणि यंदाच्या २० मार्च रोजी नदीच्या संपूर्ण १२ किमीच्या पात्रात पुन्हा एकदा पाणी खळाळून वाहू लागले.
मुख्य म्हणजे या कामासाठी कोणतीही यंत्रे वापरली गेली नाहीत. गावकऱ्यांसाठी हे केवळ रोजगासाठी केलेले काम नव्हते तर त्यामागे सामाजिक बांधिलकी होती. यातून नदीच्या रूपाने गावाने गमावलेला एक अमूल्य नैसर्गिक ठेवा पुन्हा प्राप्त करता आला, असे सांगून पन्निकर यांनी गावकऱ्यांचे सार्थ कौतुक केले.
कुट्टमपेरूर ही अचनकोविल आणि पम्पा या दोन मुख्य नद्यांना जोडणारी उपनदी आहे. ती अचनकोविल येथे उगम पावते व एन्नाक्कड, बुधनूर, कुट्टमपेरूर, मन्नार आणि पंदानाड येथून वाहात जाऊन अखेरीस पथनामथिट्टा जिल्ह्यात परुमलाजवळ नक्किडा येथे पम्पा नदीला जाऊन मिळते. अचनकोविल आणि पम्पा या नद्यांच्या पुराचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण करण्याचे काम कुट्टमपेरूर नदी करते.
आटलेली नदी पुन्हा प्रवाहित करण्याचा विचार सर्वप्रथम सन २०१३ मध्ये पुढे आला. त्यानंतर सलग दोन वर्षे अपुऱ्या पावसाने पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली तेव्हा हा विषय अधिक निकडीने पुढे आला. पर्यावरणवादी, स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांनी अनेक पर्यायांवर विचार केला.

Web Title: 'MNREGA' river revived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.