राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार; ईव्हीएमविरोधात 'राज'कारण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 06:18 PM2019-07-26T18:18:43+5:302019-07-26T18:21:13+5:30

राज ठाकरेंकडून ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणी

MNS chief Raj Thackeray to meet Mamata Banerjee to discuss EVM issue | राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार; ईव्हीएमविरोधात 'राज'कारण तापणार

राज ठाकरे ममता बॅनर्जींना भेटणार; ईव्हीएमविरोधात 'राज'कारण तापणार

Next

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे येत्या आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार आहेत. ईव्हीएमविरोधात मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे आणि ममता बॅनर्जींमध्ये बैठक होणार आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी राज यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर जवळपास दीड महिन्यांनी राज ठाकरे 'पॉलिटिकल पीच'वर उतरले होते. पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन त्यांनी स्वतः दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिलं होतं. तब्बल १४ वर्षांनी ते दिल्लीला गेले होते. या भेटीत त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या दिशेनं मनसेनं टाकलेलं पहिलं पाऊल म्हणूनच त्यांच्या या भेटीकडे पाहिलं गेलं होतं.  मात्र या घडामोडींनंतर, राज ठाकरे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात असल्याचंही बोललं जात होतं. आता ईव्हीएमचा मुद्दा घेऊनच ते ममता बॅनर्जी यांना भेटायला जाणार असल्यानं हा संशय अधिक बळावला आहे. मोदी सरकारविरोधातील ममता बॅनर्जी यांचा राग आणि ईव्हीएमला त्यांचा असलेला विरोध हा सर्वज्ञातच आहे. त्यामुळे ही 'राजनीती' कुठल्या दिशेने जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्या, अशी मागणी राज यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी ८ जुलैला निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 'गेल्या 20 वर्षांपासून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. 2014च्या आधी भाजपानंदेखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. मात्र 2014 नंतर त्यांचा सूर बदलला,' असं राज यांनी यावेळी म्हटलं होतं. मात्र निवडणूक आयोगाकडून आपल्याला शून्य अपेक्षा असल्याचंदेखील त्यांनी बोलून दाखवलं होतं. केवळ औपचारिकता म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं राज म्हणाले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं ठरेल. निवडणूक आयोगाला भेटलात का?, असं तुम्ही विचाराल म्हणून त्यांची (आयोगाची) भेट घेतल्याचं राज ठाकरेंनी पत्रकारांना सांगितलं होतं.
 

Web Title: MNS chief Raj Thackeray to meet Mamata Banerjee to discuss EVM issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.