Raj Thackeray: ही राजेशाही नाहीय! राज ठाकरेंनी जिभेला आवर घालावा; अयोध्येवरून योगींच्या मंत्र्याचा इशारावजा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 07:07 PM2022-07-23T19:07:04+5:302022-07-23T19:07:25+5:30
Raj Thackeray Ayodhya Visit: राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतू तेथील भाजपा खासदाराने राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
रामाच्या दर्शनाला कोणीही येऊ शकतो. मात्र, प्रत्येकाने स्वत:मध्ये वाकून पहावे. आम्ही पळवून लावणार, आणि नंतर त्यांच्या परिसरात जाणार. अशा भाषेचा वापर भारतात करू नये. हिंदुस्थान सर्वांचा आहे. कोणा राजकारण्याने विकत घेतलेला नाहीय. महाराष्ट्र कोणी विकत घेतलेला नाही. ही लोकशाही आहे, राजेशाही नाहीय. लोकसेवकांनी अशा भाषेच्या मर्यांदांचे पालन करायला हवे, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मंत्री ठाकुर रघुराज सिंह यांनी दिला आहे.
राज ठाकरेंना मी विनंती करेन की, तुम्ही तुमच्या जिभेला आवर घालावा. उत्तर भारतीय काही पाकिस्तानी नाहीत. उत्तर भारतानेच जगावर राज्य केले आहे. भगवान राम, कृष्ण महाराष्ट्रात कुठे जन्माला आलेत ते सांगा. महाराष्ट्र संतांची भूमी आहे हे मान्य आहे, परंतू हे देव उत्तर भारतातच जन्माला आले. आराध्य देव जिथे जन्मले तिथे तुम्ही जात असाल तर आम्ही रोखणार नाही, असे योगींच्या सरकारमधील मंत्री रघुराज सिंह यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातून गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेली जात असल्याच्या आरोपावर देखील सिंह यांनी उत्तर दिले आहे. आम्ही ज्यांना सुविधा देणार ते येतील. भारताच्या बाहेर थोडीच जात आहेत. आम्ही या सुविधा देण्यासाठी कार्यालय खोलले आहे. तुम्ही सुविधा देणार नाही, आमच्याकडेही येऊ देणार नाही, असे थोडीच होणार आहे, असा सवालही त्यांनी केला. एनबीटीला त्यांनी ही मुलाखत दिली आहे.
राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतू तेथील भाजपा खासदाराने राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. यावरून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकारण तणावपूर्ण झाले होते. दौऱ्याआधीच राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणावरून दौरा पुढे ढकलणार असल्याचे जाहीर केले होते.