Mob Lynching : बाईक चोरीच्या संशयातून MBAच्या विद्यार्थ्याची जमावाकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 10:21 AM2018-09-16T10:21:20+5:302018-09-16T10:43:01+5:30
Mob Lynching :बाईक चोरी केल्याच्या संशयातून एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत जमावानं त्याची हत्या केली आहे.
इम्फाळ - देशभरात मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत जात आहे. आता मणिपूरमधूनही मॉब लिंचिंगची हादरवणारी घटना समोर आली आहे. बाईक चोरी केल्याच्या संशयातून एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत जमावानं त्याची हत्या केली आहे. 13 सप्टेंबर रोजीची ही घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. फारुक अहमद खान असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बाईक चोरी केल्याच्या संशयातून फारुक आणि त्याच्या मित्रांना जमावानं मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावानं फारुक ज्या कारमधून प्रवास करत होता त्याच कारलाच आग लावली. या घटनेतून, फारुकच्या मित्रांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवत घटनास्थळाहून पळ काढला. या कथित घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला आहे.
(बिहारमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग; तरुणाच्या हत्येप्रकरणी 150 जणांविरोधात गुन्हा)
मणिपूर पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून सुरक्षेच्या कारणास्तव येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मारहाण करणाऱ्यांमध्ये इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या एका हवालदाराचाही समावेश आहे. या हवालदाराच्या गॅरेजमधून फारुक व त्याच्या मित्रांनी बाईक चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.