मोबाइल व लँडलाइनचा क्रमांक होणार ११ आकड्यांचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 03:39 AM2019-09-23T03:39:42+5:302019-09-23T06:52:23+5:30
ट्रायने मागविल्या हरकती-सूचना; वाढत्या ग्राहक संख्येमुळे बदल करण्याबाबत विचार सुरू; २१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार सूचना
मुंबई : केंद्रीय दूरसंचार नियामक आयोग (ट्राय) ने देशातील मोबाइल व फिक्स्ड लाइन (लँड लाइन) दूरध्वनीचे क्रमांक समान असावेत का याबाबत कन्सल्टेशन पेपर जाहीर केला असून याबाबत सूचना व हरकती मागवल्या आहेत. २१ ऑक्टोबरपर्यंत सूचना व त्यावर काही हरकती असल्या तर ४ नोव्हेंबरपर्यंत देता येतील. त्याशिवाय देशातील वाढत्या मोबाइल संख्येमुळे सध्याचे १० आकडी मोबाइल क्रमांक ११ आकडी करण्याच्या प्रस्तावावर देखील सूचना व हरकती मागवल्या आहेत.
मोबाइल ग्राहकांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे केवळ इंटरनेट डाटासाठी (डोंगल) वापरले जाणारे १० आकडी क्रमांक यापुढे १३ आकडी करण्याचादेखील विचार मांडण्यात आला आहे. जून २०१९ मध्ये ट्रायने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशातील एकूण ग्राहकांची संख्या ११८ कोटी ६६ लाख आहे व घनतेचे प्रमाण ९०.११ आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून राष्ट्रीय नंबरिंग प्लॅनमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. दूरसंचार मंत्रालयाने ५ मे रोजी दिलेल्या शिफारशीप्रमाणे पुरेसे क्रमांक उपलब्ध होण्यासाठी मोबाइल व लँड लाइन क्रमांक समान ठेवण्याबाबत विचार करण्याचा प्रस्ताव दिला होता.
जेव्हा देशात केवळ लँड लाइन उपलब्ध होती, त्या वेळी १९९३ मध्ये पहिल्यांदा नॅशनल फंडामेंटल प्लॅन अस्तित्वात आला होता. दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या ग्राहक संख्येला लक्षात घेऊन २००३ मध्ये नॅशनल नंबरिंग प्लॅन लागू करण्यात आला. २०३० पर्यंत दूरसंचार सेवेच्या घनतेचे प्रमाण ५० टक्के असेल व ७५ कोटी टेलिफोन ग्राहक असतील. त्यामध्ये ३० कोटी लँडलाइन ग्राहक व ४५ कोटी मोबाइल ग्राहक असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र २००९ मध्येच मोबाइल ग्राहकांची संख्या ४५ कोटींवर गेली. त्या तुलनेत लँडलाइन ग्राहकांच्या संख्येत सातत्याने घट झाली.
समान संख्येचा यामुळे विचार सुरू!
मोबाइल क्रमांक १० आकड्यांवरून ११ आकडी केल्यास व त्याचा पहिला आकडा ९ ठेवल्यास एकूण क्षमता १० बिलीयनपर्यंत वाढेल. त्यामुळे याबाबत विचार सुरू असून ट्रायने प्रस्तावावर सूचना व हरकती मागवल्या आहेत.