अंधांना नोटा ओळखण्यास मोबाइल अॅपची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:31 AM2019-05-13T01:31:21+5:302019-05-13T01:31:41+5:30
सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत, शिवाय एक रुपयाची नोटही भारत सरकारने जारी केलेली आहे.
नवी दिल्ली : कमी दृष्टी किंवा पूर्णपणे अंध असलेल्यांना भारतीय चलनी नोटांचे मूल्य ओळखण्यासाठी मदत करणारे मोबाईल अॅप रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया उपलब्ध करणार आहे. सध्या १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटा चलनात आहेत, शिवाय एक रुपयाची नोटही भारत सरकारने जारी केलेली आहे. सध्या अंध व्यक्तींना १०० रुपयांच्या वरील चलनी नोटा ओळखता याव्यात यासाठी इन्टॅग्लिओ प्रिंटिंग बेसड् आयडेंटिफिकेशन मार्क्सचा उपयोग होतो आहे.
मोबाईल अॅप विकसित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तंत्रज्ञान कंपन्यांकडून निविदा मागवल्या
आहेत. या मोबाईल अॅपद्वारे महात्मा गांधी मालिकेतील आणि महात्मा गांधी मालिकेतील (नवी) सर्व
चलनी नोटा ओळखता आल्या पाहिजेत, असे बँकेने निवेदनात
म्हटले.
मोबाईल कॅमेऱ्यासमोर नोट ठेवल्यावर तिचा फोटो घेणे किंवा नोटेवरून कॅमेरा फिरवल्यास नोट ओळखता यावी. या अॅपद्वारे अवघ्या दोन किंवा त्यापेक्षा कमी सेकंदांत चलनी नोट ओळखता आली
पाहिजे आणि हे अॅप इंटरनेट जोडणीशिवाय आॅफलाईनही वापरता आले पाहिजे. हे मोबाईल अॅप अनेक भाषांयुक्त असेल, तसेच आॅडिओ नोटिफिकेशन्ससह असावे. सध्या हे अॅप किमान हिंदी आणि इंग्रजी भाषेत अपेक्षित आहे.