उत्तर प्रदेशात महाविद्यालयांत मोबाइल बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 04:53 AM2019-10-19T04:53:49+5:302019-10-19T04:54:12+5:30
शिक्षकांनाही नियम लागू : मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा निर्णय
लखनौ : उत्तर प्रदेशमधील महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये मोबाईलचा वापर करण्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने बंदी घातली आहे. राज्यातील उच्च शिक्षण खात्याच्या सचिवांनी तसे परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन येण्यास यापुढे बंदी घालण्यात आली आहे. हा नियम विद्यार्थ्यांबरोबरच अध्यापकांनाही लागू आहे. उच्च शिक्षण देणाऱ्या या संस्थांमध्ये शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविद्यालये, तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थी, तसेच अध्यापक मोबाईलमध्ये गुंतून स्वत:चा बहुमूल्य वेळ फुकट घालवतात. त्याला आळा बसण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच मंत्रिमंडळ, तसेच अन्य सरकारी बैठकांमध्ये
मोबाईल घेऊन येण्यास बंदी घातली आहे. काही महत्त्वाच्या बैठकांमध्ये मंत्री व अधिकारी एकमेकांना व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठविताना आढळून आल्याने योगी आदित्यनाथ विलक्षण नाराज झाले होते. (वृत्तसंस्था)
अव्वल शिक्षण हवे
उत्तर प्रदेश व कर्नाटक राज्यामध्ये उच्च शिक्षण घेण्यात मुलींनी मुलांवर कुरघोडी केली आहे. देशातील उच्च शिक्षणासंदर्भात केलेल्या एका पाहणीचा अहवाल मनुष्यबळ विकास खात्याने सप्टेंबर महिन्यात प्रसिद्ध केला. त्यात ही माहिती देण्यात आली होती.
उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या वर्षी महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये शिकत असलेल्या मुलांपेक्षा मुलींची संख्या ९० हजारांनी जास्त आहे. उत्तर प्रदेशचा इतर राज्यांच्या तुलनेत फारसा विकास झालेला नाही.
तेथील व बिहारच्या शिक्षणसंस्थांच्या दर्जाबद्दल अन्य राज्यांत चांगली भावना नाही. उत्तर प्रदेश शैक्षणिक क्षेत्रातही अव्वल दर्जाचा असावा, असा निर्धार योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केला होता.