कोट्यवधी लोकांना सावधतेचा इशारा; मोबाईल ग्राहकांची ‘केवायसी’च्या नावाखाली होतेय फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:48 AM2021-08-30T08:48:36+5:302021-08-30T08:55:26+5:30
Mobile Companies alerts customers about online kyc fraud : कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करून फसवणूक करतात.
नवी दिल्ली : मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी ‘केवायसी’च्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाईन फसवणूकीपासून सावध होण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात कंपन्यांनी ॲडव्हायजरी जारी केली आहे. सर्वप्रथम एअरटेलने फसवणूक करणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यात आली होती. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी सर्व ग्राहकांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. त्या त्यांनी मोबाईल वापरकर्त्यांना कसे फसवित आहे, याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करून फसवणूक करतात. आता व्होडाफोन-आयडीयानेदेखील एका ॲडवाजरी जारी केली आहे. फसवणूक करणारे ग्राहकांना कसे टार्गेट करतात, याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. अज्ञात क्रमांकावरून एसएमएस आणि कॉल्स करण्यात येतात. त्यातून ग्राहकांना त्वरित केवायसी अपडेट करण्याचे सांगण्यात येते. अपडेट न केल्यास सिम ब्लॉक करण्याची धमकीही देतात.
अशी होते फसवणूक
कॉल करणारे स्वत:ला कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगतात. कॉल किंवा एसएमएसवर पूर्ण केवायसी फॉर्म भरण्यास सांगतात. त्यानंतर गुगल प्ले स्टोरवरून एक क्विक सपोर्ट ॲप इन्स्टॉल करण्यास सांगतात. तेथून टीम व्ह्यूअर ॲपवर नेतात. या ॲपवरून स्कॅमर्सकडे तुमच्या फोनचे पूर्ण नियंत्रण मिळते. ते बॅंकिंग पासवर्डसह सर्व महत्त्वपूर्ण माहिती गोळा करून बॅंकेतून पैसेही चोरू शकतात. याबाबत सर्व सेल्युलर ऑपरेटर्सने इशारा दिला असून असे कॉल किंवा एसएमएस टाळण्याची सूचना देण्यात आली आहे