गुजरातमध्ये ठाकोर समुदायाच्या मुलींना मोबाइल बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 05:37 AM2019-07-18T05:37:12+5:302019-07-18T05:37:26+5:30
अविवाहित मुली व महिलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालणारा फतवा गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ठाकोर समुदायाने जारी केला आहे.
पालनपूर : अविवाहित मुली व महिलांना मोबाइल वापरण्यास बंदी घालणारा फतवा गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ठाकोर समुदायाने जारी केला आहे. एवढेच नाही, तर आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना दीड ते दोन लाख रुपयांचा दंड करण्याचे फर्मानही सोडले आहे.
या जिल्ह्यातील दांतीवाडा तालुक्यातल्या १२ गावांतल्या ठाकोर समुदायातील ज्येष्ठ सदस्यांच्या १४ जुलैला झालेल्या बैठकीत एकमताने हे निर्णय घेण्यात आले. या अन्यायकारक निर्णयांचे वाव तालुक्यातील काँग्रेसच्या आमदार गनिबेन ठाकोर यांनी उघड समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, अविवाहित मुलींनी मोबाइल फोन वापरण्यावर घातलेली बंदी अजिबात चुकीची नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गोष्टींपासून या मुलींनी लांबच राहिले पाहिजे व आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे.
ठाकोरांच्या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका आदेशात म्हटले आहे की, या समुदायातील अविवाहित मुली मोबाइल फोन वापरताना पकडल्या गेल्या, तर त्यासाठी त्यांच्या पालकांना जबाबदार धरण्यात येईल. महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया मुलींना मोबाइल देऊ नका. त्यामुळे मोबाइलच्या नादी लागून त्या वेळ वाया घालविणार नाहीत. त्याऐवजी या मुली अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करतील. ठाकोर समुदायातील जी मुले-मुली आंतरजातीय विवाह करतील, त्यांच्या पालकांना दीड ते दोन लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल.
दांतीवाडा येथील ठाकोरांचे एक नेते सुरेश ठाकोर यांनी सांगितले की, महाविद्यालयीन युवक-युवती मोबाइलवर नानाप्रकारचे व्हिडीओ तयार करत असतात. मोबाइल वापरण्यास बंदी केल्यानंतर या युवक-युवतींना लॅपटॉप, टॅबलेट देण्याचा ठाकोरांचा विचार आहे. या साधनांचा उपयोग हे विद्यार्थी अभ्यासासाठी करतील.
>लग्नामध्ये डीजे,
फटाके वाजविण्यास मनाई
त्यातून वाचलेला पैसा या समुदायातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला जाणार आहे. या निर्णयांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. काँग्रेसचे आणखी एक आमदार अल्पेश ठाकोर यांनाही या निर्णयामध्ये काहीही वावगे वाटत नाही.
>ठाकोर समुदायात होणाºया लग्नांवर होणारा अव्वाच्या सव्वा खर्चात कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. लग्नामध्ये डीजे आणणे, फटाके वाजविणे, पैशाची उधळपट्टी करत वरात काढणे या गोष्टींवर ठाकोरांनी बंदी घातली आहे.