कॉलगर्लच्या नावे फेसबूकवर पोस्ट केला सासूचा मोबाइल नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 05:08 PM2017-11-22T17:08:54+5:302017-11-22T17:22:57+5:30
पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला त्रास देण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार केलं. इतकंच नाही तर त्याने प्रोफाइलमध्ये काही अश्लिल कमेंट करत सासूचा मोबाइल क्रमांकही शेअर करुन टाकला.
गाजियाबाद - पत्नीशी भांडण झाल्यानंतर तिला त्रास देण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने फेसबुकवर बनावट प्रोफाइल तयार केलं. इतकंच नाही तर त्याने प्रोफाइलमध्ये काही अश्लिल कमेंट करत सासूचा मोबाइल क्रमांकही शेअर करुन टाकला. आरोपी पतीने फेसबुकवर आपल्या पत्नीचा कॉलगर्ल म्हणून उल्लेख करत सोबत सासूचा मोबाइल क्रमांक देऊन टाकला. यानंतर महिलेला रोज फोन येऊन लागले. सुरुवातीला हे काय चालू आहे हे त्यांना समजलंच नाही. पण नंतर जेव्हा प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला यासंबंधी माहिती दिली.
पीडित महिलेच्या मुलाने फोन करणा-या व्यक्तींना जाब विचारण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी आपल्याला हा फोन नंबर फेसबुकवरुन मिळाल्याची माहिती दिली. मंगळवारी पीडित महिला आपल्या मुलीसोबत सिहानी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. पण पोलिसांनी कोणतीही तक्रार दाखल करुन न घेता, आम्हाला सायबर सेलकडे पाठवून दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.
पीडित महिलेच्या मुलीचा पतीवर आरोप -
वयस्कर महिलेच्या मुलीने सांगितलं आहे की, 'एक वर्षापुर्वी माझं लग्न नोएडामधील कंपनीत काम करणा-या एका तरुणाशी झालं होतं. लग्नानंतर तो हुंड्याची मागणी करत त्रास देऊ लागला होता. दरदिवशी तो काहीतरी मागणी करायचा. आपली मागणी पुर्ण झाली नाही की, मारहाण करायलाही पुढे मागे पहायचा नाही. त्याच्या त्रासाला कंटाळूनच आपण घर सोडून दिलं होतं'. मला त्रास देण्यासाठीच माझ्या पतीने आईचा फोन क्रमांक फेसबुकवर टाकला असल्याचा आरोप मुलीने केला आहे.
पोलिसांचा तक्रार दाखल करुन घेण्यास नकार -
यासंबंधी पीडित महिला तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली असता पोलिसांनी सायबर क्राइम विभागाकडे पाठवत तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. सिहानी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी विनोद पांडे यांना विचारलं असता आपल्याला काही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण जर तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला असेल तर ते चुकीचं आहे असंही ते बोलेले आहेत.