मोबाइल फोनमध्ये येणार पॅनिक बटन
By admin | Published: June 10, 2016 04:14 AM2016-06-10T04:14:22+5:302016-06-10T04:14:22+5:30
सर्व मोबाइल फोनमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देऊ शकणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या सूचना सरकारने मोबाइल उत्पादक कंपन्यांना केली आहे.
नवी दिल्ली : आपत्कालीन स्थितीत साह्यभूत व्हावे, यासाठी सर्व मोबाइल फोनमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देऊ शकणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या सूचना सरकारने मोबाइल उत्पादक कंपन्यांना केली आहे.
दूरसंचार विभागाने या संबंधीचा आदेश जारी केला आहे. या आधी विभागाने कंपन्यांना १ जानेवारी २0१७ नंतर विकणाऱ्या सर्व फोनमध्ये ही सुविधा देण्याचे आदेश दिले होते. आता सध्या अस्तित्वात असलेल्या फोनमध्येच ही सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे. हँडसेट उत्पादक कंपन्यांना दिलेल्या निर्देशांत दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, सध्या ग्राहकांकडे असलेल्या हँडसेटमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देणारे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यासाठी किरकोळ विक्री केंद्रांवर व्यवस्था करण्यात यावी.
जारी आदेशानुसार की-पॅडवरील ५ किंवा ९ क्रमांकाचे बटन दाबल्यास आपत्कालीन क्रमांक ११२ वर फोन लागेल. ११२ हा आपत्कालीन क्रमांक १ जानेवारीपासून कार्यान्वित होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्व आपत्कालीन सेवांच्या क्रमांकाची जागा हाच एकमेव क्रमांक घेईल. सध्या पोलिसांसाठी १00, तर अॅम्बुलन्स सेवेसाठी १0२ हा क्रमांक वापरला जातो. ११२ क्रमांकाची सेवा पूर्णांशाने सुरू झाल्यानंतर हे क्रमांक बंद होतील.