मोबाइल चोरी गेला? तत्काळ उचला ही पावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 08:19 AM2023-11-25T08:19:47+5:302023-11-25T08:20:20+5:30
काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
नवी दिल्ली : इंटरनेट-स्मार्टफोनचा वापरामुळे ऑनलाइन खरेदीचे प्रमाण देशात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यूपीआय व्यवहारांनी आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. परंतु याचबरोबर सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या आर्थिक लुबाडणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अशात चोरट्याने तुमचा स्मार्टफोन लांबवल्यास त्यातील माहितीचा वापर करून तुमचे बँक खाते साफ केली जाण्याची भीती असते. त्यामुळे ग्राहकांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
पासवर्ड कधीही सेव्ह करू नका
स्मार्टफोनमध्ये युजर्सची खासगी माहिती आणि व्यवहारांची नोंद असते. चोराकडून बँक खाते साफ केले जाऊ नये यासाठी पासवर्ड कुठेही सेव्ह करू नये, ही बाब लक्षात ठेवा. तुमची आर्थिक माहिती असलेल्या सर्व प्रकारच्या ॲप पासवर्ड लॉक करा. आपले नेट बँकिग पासवर्ड मोबाइल तसेच गुगल अकाऊंटवर कधीही सेव्ह करू नका.
पासवर्ड सुरक्षेची खबरदारी घ्या
आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲप्सवर पासवर्डच्या माध्यमातून दुहेरी सुरक्षा द्या. मोबाइल पासवर्ड असल्याने कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तो चालू करणे शक्य होत नाही. तसेच पासवर्ड असल्याने अॅपचाही वापर करणे शक्य होत नाही.
अधिक ॲप्सचा वापर टाळा
युजर्स अनेक प्रकारच्या अॅप्सचा वापर करतात. परंतु हे चुकीचे आहे. यामुळे मोबाइलमध्ये छेडछाडीच्या शक्यता वाढतात. व्यवहारांसाठी एक ॲप पुरेशी असते. वरवरचा खर्च, अचानकच्या खर्चासाठी मोबाइल वॉलेटमध्ये काही पैसे ठेवणे चांगले ठरते.
यूपीआय तातडीने ब्लॉक करा
चोरट्याने मोबाइल लांबवल्यास कस्टमर केअरवर फोन करून बँक खाते व यूपीआय ब्लॉक करा. यासाठी उशीर लावू नका. अन्य मोबाइलवरहूनही तुम्हाला हे काम करणे शक्य असते.
सुरक्षित ॲप्सचा वापर करा
सध्या युजर्ससाठी अनेक प्रकारच्या यूपीआय ॲप उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या तक्रारींवरून आरबीआय सातत्याने सदोष ॲपवर कारवाई करीत असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम ॲपचा वापर करा. सुरक्षेबाबत सर्व फिचर्सची पडताळणी करून अपची निवड करा.