सरकारी इमारतींवर आता मोबाईल टॉवर
By admin | Published: September 12, 2015 03:01 AM2015-09-12T03:01:04+5:302015-09-12T03:01:04+5:30
कॉल ड्रॉपसह अन्य नेटवर्क समस्यांचा सामना करणाऱ्या मोबाईल युजर्सना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणून, राजधानी दिल्ली आणि अन्य काही शहरांमधील शासकीय
नवी दिल्ली : कॉल ड्रॉपसह अन्य नेटवर्क समस्यांचा सामना करणाऱ्या मोबाईल युजर्सना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणून, राजधानी दिल्ली आणि अन्य काही शहरांमधील शासकीय इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने घेतला आहे.
यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि अशा प्रकारचे टॉवर्स उभारण्यासाठी प्रस्ताव आणणे आणि सूचना करण्याचे काम दूरसंचार विभागालाच करावे लागणार आहे.
हा मुद्दा केवळ शासकीय इमारतींशी संबंधित असल्याकारणाने मोबाईल टॉवर्स उभारण्याच्या दिशेने आवश्यक असलेले पाऊल तात्काळ उचलले जाऊ शकते, असे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
राजधानीत नेटवर्कची समस्या तीव्र
गेल्या काही महिन्यांत दिल्लीसह अन्य अनेक शहरांमध्ये नेटवर्कची समस्या तीव्र होत चालली आहे. निवासी भागांमधील मोबाईल फोन टॉवर्सपासून आरोग्याला धोका निर्माण होेण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे दिल्लीतील महानगरपालिका प्रशासनाने अनेक मोबाईल टॉवर्स सील केले आहेत.
निदान आमची कार्यालये असलेल्या इमारतीच्या ठिकाणी तरी मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आम्ही शक्य ती आवश्यक पावले उचलणार आहोत. हा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि ग्राहकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकार सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे, असे हा अधिकारी म्हणाला.
(लोकमत न्यूज नेटवर्क)