माेबाइल, टीव्ही, फ्रीज हाेणार स्वस्त; सरकारने जीएसटी केला कमी, लवकरच घटणार दर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 07:28 AM2023-07-03T07:28:52+5:302023-07-03T07:29:23+5:30
नवी इलेक्ट्राॅनिक उपकरणे खरेदी करण्याची ज्यांची याेजना आहे, त्यांना फायदा हाेणार आहे.
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या अंमलबजावणीला नुकतीच ६ वर्षे झाली. त्यानंतर सरकारने लाेकांना एक गुड न्यूज दिली आहे. काही इलेक्ट्राॅनिक्स उपकरणांवरील जीएसटी सुमारे १९ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्यामुळे माेबाइल, रेफ्रीजरेटरसह अनेक उपकरणे स्वस्त झाली आहेत.
नवी इलेक्ट्राॅनिक उपकरणे खरेदी करण्याची ज्यांची याेजना आहे, त्यांना फायदा हाेणार आहे. या वस्तूंवर ३ ते १९ टक्क्यांपर्यंत जीएसटी घटविला आहे. जीएसटी घटविल्यामुळे उत्पादनांच्या किमतीदेखील लवकरच कमी हाेतील, अशी शक्यता आहे.
सर्वात स्वस्त काय?
जीएसटी कपातीनंतर सर्वात स्वस्त माेबाइल हाेणार आहेत. माेबाइल फाेनवरील जीएसटी सर्वाधिक १९.३ टक्के घटविला आहे. आधी ३१.३ टक्के जीसटी हाेता. आता केवळ १२ टक्के जीएसटी द्यावा लागेल. त्यामुळे माेबाइल स्वस्त हाेण्याची अपेक्षा आहे.
या वस्तूंच्या किमती घटणार
गीझर, पंखे, कूलर, फ्रीज, वाॅशिंग मशीन, मिक्सर ज्यूसर, व्हॅक्यूम क्लीनर इत्यादी.या वस्तूंवरील जीएसटी १३.३ टक्क्यांनी घटविला आहे.
टीव्ही खरेदीवर फायदा नाही
टीव्ही उत्पादक कंपन्या ३२ इंच किंवा त्यापेक्षा जास्त आकाराचेच टीव्ही जास्त बनवितात. त्यामुळे टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फार फायदा झालेला नाही.