कर्नाटकात सर्व मंदिरांमध्ये मोबाईल वापरावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 01:17 PM2023-07-18T13:17:00+5:302023-07-18T13:17:28+5:30
प्रकाश बेळगोजी बेळगाव : धर्मादाय विभागाने राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी ...
प्रकाश बेळगोजी
बेळगाव : धर्मादाय विभागाने राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपले मोबाईल स्विच ऑफ करावे लागणार आहेत. मंदिर परिसरात गाणी ऐकणे, रील तयार करणे, फोटो काढणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. धर्मादाय विभागाने काल सोमवारी (दि.१७) याबाबत अधिकृत आदेश जारी केला आहे.
आदेशानुसार बेळगाव शहरातील सुप्रसिद्ध श्री कपिलेश्वर मंदिर, टिळकवाडी येथील साई मंदिर, अनगोळचे परमार्थ निकेतन श्री हरी मंदिर, समादेवी गल्लीतील श्री समादेवी मंदिर, वीरभद्र नगर येथील श्री वीरभद्र मंदिर तसेच पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज मंदिर, सौंदत्तीचे श्री यल्लमा, मंदिर रायबाग तालुक्यातील चिंचली मायाक्का मंदिर, बडकुंद्री येथील श्री होळम्मा देवी मंदिर या मंदिरांमध्ये देखील आता भाविकांना मोबाईलचा वापर करता येणार नाही.
अलीकडेच तामिळनाडू आणि केदारनाथ मंदिरात मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी शांत व भक्तीपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यानंतर कर्नाटकातही निर्बंध घालण्यात आले.