चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याचा हल्ला
By Admin | Published: July 19, 2016 12:13 AM2016-07-19T00:13:36+5:302016-07-19T00:21:21+5:30
औरंगाबाद : शहरातील जवाहर कॉलनी परिसरातील एका अडीच वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना रविवारी घडली;
औरंगाबाद : शहरातील जवाहर कॉलनी परिसरातील एका अडीच वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना रविवारी घडली; परंतु परिसरातील नागरिकांमुळे वेळीच चिमुकल्याची सुटका झाली.
शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असताना त्याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. अशीच घटना रविवारी उत्तमनगर, जवाहर कॉलनी येथे घडली. समर्थ चंद्रकांत खाडे हा अडीच वर्षांचा चिमुकला घराजवळ खेळत होता. यावेळी अचानक एका मोकाट कुत्र्याने हल्ला करून त्यास चावा घेतला.
त्याचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ कुत्र्याला पिटाळून लावले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
समर्थला त्याच्या वडिलांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांना अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून आणण्याचे सांगण्यात आले. कुत्रा चावल्यामुळे दररोज घाटीत दहा ते पंधरा रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याने रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सध्या अॅन्टी रेबीज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले.