बिग बींचा आदर्श, उत्तरप्रदेश सरकारने दिलेलं पेन्शन नाकारलं
By admin | Published: October 21, 2015 12:40 PM2015-10-21T12:40:18+5:302015-10-21T12:54:04+5:30
उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कारांतर्गत दिलेले ५० हजार रुपयांचे मासिक पेन्शन परत करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २१ - उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कारांतर्गत दिलेलं ५० हजार रुपयांचे मासिक पेन्शन परत करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ही रक्कम राज्यातील गरीबांसाठी वापरली पाहिजे असे सांगत बच्चन कुटुंबीयाने पेन्शन नाकारली आहे.
उत्तरप्रदेश सरकारने यश भारती पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना मासिक ५० हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. उत्तर प्रदेशसी संबंधीत असलेल्या व्यक्तींना सरकारतर्फे यश भारती हा पुरस्कार दिला जातो. १९९४ पासून हा पुरस्कार सुरु झाला असून आत्तापर्यंत १५० व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि जया बच्चन या तिघांचाही समावेश आहे. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाईल अशी घोषणा सरकारने केली होती. विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत हा पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यापैकी बहुसंख्य लोकांची आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे अशा सधन मंडळींना पेन्शन देण्याची घोषणा करुन सरकारने काय साधले असा सवाल उपस्थित होता.
'उत्तरप्रदेश सरकारने दिलेल्या सन्मानाचा मी आदर करतो, बच्चन कुटुंबीय विनम्रतेने हे पेन्शन परत कऱण्याचा निर्णय घेत असून आम्हाला दिली जाणारी पेन्शनची रक्कम गरीब व गरजू व्यक्तींना द्यावी' असे अमिताभ बच्चन यांनी म्हटल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.