मॉडेल चहावाली! 'मिस गोरखपूर' झालेली तरुणी आता विकतेय चहा; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 07:47 PM2022-09-26T19:47:04+5:302022-09-26T19:54:23+5:30
Model Chaiwali : चहा विकणारी सिमरन गुप्ता आधी मॉडेलिंग करायची. सिमरन गुप्ताने तिचे मॉडेलिंग करिअर सोडून चहा विकायला सुरुवात केली
'मिस गोरखपूर' झालेल्या एका मुलीने मॉडेलिंग सोडून आता चक्क चहा विकायला सुरुवात केली आहे. सिमरन गुप्ता असं या तरुणीचं नाव असून ती गोरखपूर चौकात चहा विकते. मिस गोरखपूर झालेली मुलगी आता चहाचा स्टॉल का लावते हे बहुतेकांना जाणून घ्यायचं आहे. वास्तविक, एमबीए चहावाला प्रफुल्ल बिलोरे आणि पाटनाची ग्रॅज्युएट चहावाली प्रियंका गुप्ता यांना पाहून ही मुलगी खूप प्रभावित झाली. यानंतर मुलीने मॉडेलिंग सोडून चहा विकायला सुरुवात केली.
मॉडेलिंग सोडून चहाचा स्टॉल केला सुरू
गोरखपूर चौकात तुम्हाला 'मॉडेल चहावाली' नावाचा चहाचा स्टॉल दिसेल. चहा विकणारी सिमरन गुप्ता आधी मॉडेलिंग करायची. सिमरन गुप्ताने तिचे मॉडेलिंग करिअर सोडून चहा विकायला सुरुवात केली आणि आज तिच्या स्टॉलवर लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. सिमरन गुप्ता चहा विकतानाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
...म्हणून मॉडेलिंग सोडावं लागलं
'मिस गोरखपूर' झालेल्या सिमरन गुप्तानेही तिचा चहा विकण्याचे कारण सांगितले आहे. सिमरनने सांगितले की, ती 2018 मध्ये मिस गोरखपूर झाली. मॉडेलिंगच्या दुनियेत ती चांगली कामगिरी करत होती, पण कोरोना आल्यानंतर तिला मॉडेलिंग सोडावं लागलं. यानंतर त्याने एमबीए चहावाला प्रफुल्ल बिलोरे आणि ग्रॅज्युएट चहावाली प्रियंका गुप्ता यांच्याकडून प्रेरणा घेऊन चहाचं दुकान सुरू केलं. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती असंही तिने म्हटलं आहे.
स्टॉलचं नाव 'मॉडेल चहावाली'
सिमरनने तिच्या स्टॉलचं नाव 'मॉडेल चहावाली' का ठेवलं? याबाबतही माहिती दिली आहे. स्टॉलच्या नावासोबत तिचा व्यवसायही जोडला गेल्याचं म्हटलं आहे. सिमरनने सांगितले की, जेव्हा प्रियंका गुप्ता आणि प्रफुल्ल बिलोरे चहा विकू शकतात, तेव्हा ती देखील करू शकते. सिमरनला एक भाऊ आहे. सिमरनने एका ठिकाणी काम केले आहे, मात्र तिचा पगार अनेक महिन्यांपासून अडकला होता. सिमरनचे वडीलही आता मुलीच्या कामावर खूप खूश आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.