आधुनिक युगातील हा मोगलीच! कर्नाटकात चर्चेचा विषय; दोन वर्षांचा मुलगा माकडांचा ‘दोस्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:37 AM2017-12-23T01:37:49+5:302017-12-23T06:17:01+5:30
दोन वर्षांच्या समर्थ बांगरी या चिमुकल्याचे आई - वडील परिसरात शेतात काम करण्यास जात असत, तेव्हा तो माकडांशी खेळत बसायचा. सुरुवातीला गावक-यांना असे वाटले की, ही माकडे मुलावर हल्ला करू शकतात..
धारवाड : दोन वर्षांच्या समर्थ बांगरी या चिमुकल्याला भलेही अद्याप स्पष्ट बोलता येत नसेल. पण, माकडांसोबतच्या अनोख्या मैत्रीमुळे हा चिमुकला सध्या ‘मोगली’ म्हणून ओळखला जात आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील अलापूर येथील हा मुलगा चर्चेचा विषय आहे.
‘जंगल बुक’मधील मोगली तसा सर्वांच्याच परिचयाचा आहे. पण, कर्नाटकातील हा मोगली चक्क माकडांच्या टोळीमध्ये सामावून
जातो आणि त्यांच्याशी खेळताना जराही दबकत नाही.
समर्थचे काका बरमा रेड्डी यांनी सांगितले की, या मुलाचे आई - वडील परिसरात शेतात काम करण्यास जात असत, तेव्हा हा मुलगा माकडांशी खेळत बसायचा. सुरुवातीला गावक-यांना असे वाटले की, ही माकडे मुलावर हल्ला करू शकतात. मात्र, लवकरच हे स्पष्ट झाले की, ही माकडे अगदी आनंदाने या मुलाशी खेळत बसतात.
ही माकडे आणि या मुलांची भेट आता नेहमीचीच झाली आहे. माकडांची टोळी त्याला दररोज भेटायला येते. हा मुलगा झोपी
गेला असेल तर त्याला उठवून ही माकडे त्याच्याशी खेळतात आणि मगच येथून जातात. विशेष म्हणजे ही माकडे फक्त याच मुलाशी खेळतात. दुस-या मुलांनी माकडांसोबत खेळण्याचा प्रयत्न केला तर, माकडे त्या मुलावर हल्ला करण्यासाठी पुढे होतात. (वृत्तसंस्था)