Modi@4: "चांगल्या सरकारमुळे चार वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारली"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 01:55 PM2018-05-26T13:55:21+5:302018-05-27T01:28:27+5:30
फेसबूक ब्लॉगमध्ये अरुण जेटली यांनी अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणांबद्दल लिहिले आहे.
नवी दिल्ली- गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील उत्तम सरकार आणि उत्तम अर्थकारण व चांगले राजकारण यांच्या एकत्रित मिश्रणामुळे भारताची अर्थव्यवस्था सुधारली. एकेकाळी भारत फ्रॅजाईल फाईव्ह (नाजूक अर्थव्यवस्था असणारे पाच देश) यादीतून जगभरात ब्राईट स्पॉट म्हणजे लखलखता तारा म्हणून आता ओळखला जातो असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. रालोआ सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जेटली यांनी अर्थव्यवस्था आणि भारतातील राजकीय स्थितीबाबत विविध विषयांवरील मत व्यक्त केले. फेसबूकवर त्यांनी यावर भाष्य करणारा ब्लॉग लिहिला आहे. माय रिफ्लेक्शन्स ऑन द एनडीए गव्हर्नमेंट अफ्टर कंप्लिशन ऑफ फोर इयर्स इन पॉवर अशा मथळ्याने त्यांनी हा ब्लॉग लिहिला आहे.
अरुण जेटली यांच्यावर 14 मे रोजी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली व त्यांना शुक्रवारी अतिदक्षता विभागातून बाहेर हलविण्यात आले. पीयूष गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.
या फेसबूक ब्लॉगमध्ये जेटली लिहितात, वस्तू आणि सेवा कर लागू करणे, नोटाबंदी, काळापैश्याविरोधात उचललेली पावले अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. इन्सॉलवन्सी आणि बॅन्क्रप्सी कायद्यामुळेही कर्ज देणारा आणि कर्ज घेणारा यांच्या नात्यात बदल झाला आहे.
अरुण जेटली यांनी मुद्रा योजना, पीक विमा योजना आणि ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीबाबतही यांनी लिहलं आहे. पायाभूत सुविधांच्या विकासावर या वर्षात 134 टक्क्यांनी वाढ झाली आहे. राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचं आव्हान स्वीकारवं अशी टीका केली होती, त्यावर अरुण जेटली यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांची खिल्ली उडवताना त्यांनी लिहिलं आहे, कराचा पैसा सरकारच्या खिशात जात नसतो हे काँग्रेस अध्यक्षांना माहिती असायला हवं.
तो पैसा सरकारच्याच तिजोरीत
राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. पंतप्रधानांनी ते स्वीकारावे, असे राहुल म्हणाले होते. त्यांच्या आव्हानावर टिप्पणी करताना जेटली यांनी लिहिले आहे की, तो कराचा पैसा आहे, तो कोणाच्या खिशात जात नसतो. तो सरकारच्या तिजोरीत जातो आणि विकासासाठीच खर्च होतो,हे काँग्रेस अध्यक्षांना माहीत असायला हवे.
मोदी-शहा यांची जोडी देशाला हानिकारक
शनिवारी काँग्रेसने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्रीय सुरक्षा, काळा पैसा, भ्रष्टाचार, रोजगार, महागाई, दलित व उपेक्षित लोकांची सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला. मोदी-शहा जोडी हानिकारक असल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सरकारने लोकांचा विश्वासघात केला आहे. अशोक गहलोत म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटक आज दु:खी व भयभीत आहे. देशात सहा लाख गावे आहेत. आपण १८ हजार गावांत वीज पोहचविली असे सरकार सांगत असेल, तर ५ लाख ८२ हजार गावात वीज कोणी पोहचविली? कृषि क्षेत्राचा विकास दर नीचांकावर आहे. रोजगाराची स्थिती वाईट आहे. सर्वत्र हिंसा आणि तिरस्काराचे वातावरण आहे. दलित, आदिवासी ओबीसी आणि अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले होत आहेत.
गुलाम नबी आझाद म्हणाले की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत आहे. गेल्या चार वर्षांत तिथे सर्वाधिक जवान शहीद झाले. सर्वात जास्त नागरिक मारले गेले. एवढे अतिरेकी हल्ले कधीच झाले नव्हते.
बेरोजगारांचे हाल- सपा
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव म्हणाले की, ‘राजनीती में भ्रष्टाचार का खेल, बॅकिंग सिस्टम हुआ फेल’, ‘पेट्रोल-डिझेल के दाम उच्चतम, डॉलर के मुकाबले रुपया न्यूनतम’, ‘महँगाई पर जीएसटी की मार, दलित, गरीब, महिला पर वार, किसान बेरोजगार, कारोबारी बेहाल, मुबारक हो ये चार साल’.
अपयशी सरकार-बसपा
मायावती म्हणाल्या की, सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहे. मोदी प्रत्येक निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही ऐतिहासिक आहेत. मोदीच सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपवू पाहत आहेत. हे साफ खोटे बोलणारे नेते आहेत.